छत्रपती संभाजीनगर – मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समितीच्या आदेशानुसार मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांचे अहवाल आता सिद्ध झालेले आहेत. याविषयी ९ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता मराठवाड्याचे विभागीय आयुक्तांनी अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
१. मराठवाडा येथे कुणबी जातीचे दाखले शोधण्याचे काम युद्ध पातळीवर चालू होते. आतापर्यंत १ कोटी ७४ लाख ४५ सहस्र ४३२ कागदे पडताळण्यात आली आहेत. त्यात १४ सहस्र ९७६ पुरावे कुणबी जातीचे सापडले आहेत. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ७६ तालुक्यांत ८ सहस्र १२६ गावांत हे पुरावे सापडले आहेत. त्यातील १ सहस्र २६७ गावांत गाव नमुना ३३ आणि ३४ पुरावे सापडले आहेत. एकूण १४ सहस्र ९७६ सापडलेल्या नोंदीपैकी ९ सहस्र ७५५ कागदपत्रे पडताळून संकेतस्थळावर ४ सहस्र २८२ कागदपत्रे अपलोड झाली आहेत. १२ नोव्हेंबरपर्यंत ७० हून अधिक लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले आहेत.
२. ‘धाराशिव जिल्ह्यात मराठा कुणबी असल्याचे आणखी पुरावे आणि कागदपत्रे सापडली आहेत. धाराशिव जिल्ह्यातील ६४२ पैकी १६७ गावांत मराठा कुणबी असल्याची नोंद सापडली आहे’, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यात १६७ गावांत मराठे हे कुणबी असल्याचे समोर आले आहे.