९ नोव्हेंबरपासून चालू होत असलेल्या दीपोत्सवाच्या निमित्ताने…
जीवनाचे सर्वोच्च ध्येय असलेली आनंदप्राप्ती साध्य करण्यासाठी आपण जीवनप्रवासात विविध माध्यमे शोधत आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. हा आनंद विविध रूपांत आपल्याला लाभतोही ! असेच आनंदाचे क्षण देण्यासाठी येत असलेले एक दिव्य तेजोमय पर्व म्हणजे ‘दीपावली’ !
दीपावलीच्या अंतर्गत येणार्या प्रत्येक दिवसाचा आध्यात्मिक भावार्थ समजून घेऊन आपण दीपावलीतील प्रत्येक दिवशी आध्यात्मिक आनंद अनुभवूया. या दीपावलीतील प्रत्येक दिवस आपल्याला प्रतिदिन पुढच्या पुढच्या आध्यात्मिक टप्प्याला घेऊन जाणार आहे. त्या दृष्टीने आपण दिवाळीच्या कालावधीत आध्यात्मिक स्तरावर प्रतिदिन कसे प्रयत्नकरायचे ? याविषयीचे लिखाण देणार आहोत. त्याप्रमाणे प्रयत्न करून आपण तेजोनिधी भगवंताची कृपा संपादन करूया.
‘आध्यात्मिक दीपोत्सव’ साजरा करूया !
दीपावलीला बाह्य दिव्यांच्या दीपोत्सवासहितच आंतरिक गुणदीपांनीही आपले मनमंदिर उजळून टाकूया. आपल्या मनरूपी गाभार्यातील भगवद़्मूर्तीचे दिव्य रूप त्या दीप प्रकाशात न्याहाळूया आणि त्याची आराधना करूया. अशा प्रकारे या दीपावलीला ‘आध्यात्मिक दीपोत्सव’, ‘आध्यात्मिक प्रकाशोत्सव’ आणि ‘आध्यात्मिक आनंदोत्सव’ साजरा करूया !
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (७.११.२०२३)
सर्वोच्च आध्यात्मिक इच्छेची पूर्ती होण्यासाठी वसुबारसच्या दिवशी कामधेनूला आळवून तिचे कृपाशीर्वाद प्राप्त करूया !
वसुबारसला ‘गोवत्स द्वादशी’ असेही म्हणतात. या दिवशी गायीची आणि तिच्या वासराची कृतज्ञतेने पूजा केली जाते.
वसुबारस म्हणजे या दिवशी पृथ्वीलोकातील सर्व गायींना विष्णुलोकातील गायींचे स्वरूप प्राप्त होते, म्हणजेच ‘तिला देवत्व प्राप्त होते’, असे आपल्या शास्त्रांमध्ये म्हटले आहे. गायीलाच ‘कामधेनू’ असेही म्हणतात. कामधेनू ही समस्त इच्छांची पूर्ती करणारी आहे. साधना करणार्या जिवांसाठी ‘साधना आणि ईश्वरप्राप्ती’ हेच प्राधान्य असते आणि हेच त्याच्या जीवनाचे सर्वोच्च ध्येयही असते. ‘ईश्वरप्राप्ती’ या आपल्या सर्वोच्च आध्यात्मिक इच्छेची पूर्ती होण्यासाठी आपण सर्वांनी वसुबारसच्या दिवशी कामधेनूला, गोमातेला आळवूया आणि तिचे कृपाशीर्वाद प्राप्त करूया !
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ ( ७.११.२०२३)