रत्नागिरी – जिल्ह्यातील अल्प पटसंख्येच्या शाळा कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाहीत आणि नवीन शिक्षक भरतीमधील उमेदवारांना जिल्हा बदली मिळणार नाही, असे २ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
मंत्री दीपक केसरकर पुढे म्हणाले,
१. यापुढे आता गुणात्मक शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही पुढील वर्षीपासून होणार आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठे पालट घडून येतील.
२. मागील काही दिवस विरोधक अर्ध्या माहितीच्या आधारे आरोप करत आहेत; परंतु कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत. ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विशेष भर देण्यात येणार आहे.
३. राज्यात सुमारे ३० सहस्र नवीन शिक्षकांची भरती केली जाणार आहे. अनेक ठिकाणी स्थानिकांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली; मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे तसे करता येत नाही.
४. जिल्हा बदल्यांमुळे शिक्षकांच्या रिक्त जागांचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे नवीन भरती झालेल्या शिक्षकांसाठी जिल्हा बदली मिळणार नाही. त्यामुळे शिक्षक पदांसाठी अर्ज करतांना, उमेदवारांनी आपल्याला आयुष्यभर त्याच जिल्ह्यात त्याच शाळेत रहायचे आहे याचा विचार करूनच अर्ज भरावेत. त्यामुळे स्थानिक उमेदवारांनाही संधी मिळेल.
५. राज्यातील जवळपास २६ जिल्ह्यांमधून शिक्षक भरतीचा आराखडा तयार झाला आहे. अद्याप तीन-चार जिल्ह्यांचा आराखडा तयार व्हायचा आहे. येत्या १५ दिवसानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल, त्यानंतर भरतीची प्रक्रिया चालू होईल.