दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : तरुणीची २ लाख ९८ सहस्र रुपयांची फसवणूक ! ; महानगरपालिकेच्या पथकाला फेरीवाल्यांकडून धक्काबुक्की …शासकीय तंत्रनिकेतनच्या ग्रंथपालाची आत्महत्या…आंतरराष्ट्रीय घड्याळ आस्थापनाचा माल कह्यात…

तरुणीची २ लाख ९८ सहस्र रुपयांची फसवणूक !

अंबरनाथ – मूत्रपिंडाचा आजार असणार्‍या २३ वर्षीय तरुणीची २ लाख ९८ सहस्र रुपयांची फसवणूक अमय प्रेमचंद उपाध्याय याने केली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रत्यारोपणासाठी तात्काळ मूत्रपिंड उपलब्ध करून देणार असल्याचे सांगून अमय याने तरुणीच्या कुटुंबियांकडून पैसे उकळले; पण मूत्रपिंड दिलेच नाही. सध्या अमय फरार आहे.


महानगरपालिकेच्या पथकाला फेरीवाल्यांकडून धक्काबुक्की !

ठाणे – डोंबिवली पूर्वेतील उर्सेकरवाडी येथे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पथकातील कर्मचार्‍यांना फेरीवाल्यांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. ५० हून अधिक फेरीवाले आक्रमक झाले होते. या प्रकरणी तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. कारवाईअंतर्गत एका फेरीवाल्याचे सामान कह्यात घेतले जात असतांना त्याच्या पाठिंब्यासाठी अन्य फेरीवाले आक्रमक झाले. पथकावर गैरव्यवहार करण्याचे आरोप करत विनयभंगाची तक्रार प्रविष्ट करण्याचीही धमकी देण्यात आली.


शासकीय तंत्रनिकेतनच्या ग्रंथपालाची आत्महत्या !

जळगाव – शासकीय तंत्रनिकेतनच्या ग्रंथालयात विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी ग्रंथपाल कैलास कडधाने (वय ५३ वर्षे) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. यानंतर त्याने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली.


आंतरराष्ट्रीय घड्याळ आस्थापनाचा माल कह्यात !

जळगाव – आंतरराष्ट्रीय ब्रँड असलेल्या घड्याळांसह त्याचे बनावट सुटेभाग निर्मिती आणि विक्री करणार्‍या फुले बाजारामधील दुकानावर शहर पोलिसांच्या पथकाने धाड घालून टाकून १६ सहस्र ६४० रुपयांचा बनावट माल जप्त केला. या प्रकरणी दुकानमालक भारत तलरेजा (वय ६५ वर्षे) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


सोन्याच्या दागिन्यांसाठी वृद्धेची हत्या करणारा धर्मांध अटकेत !

मुंबई – सोन्याच्या दागिन्यांसाठी वृद्ध महिलेची हत्या केल्याप्रकरणी वडाळा पोलिसांनी महंमद फैज रफीक सय्यद उपाख्य बाबा (वय २७ वर्षे) याला अटक केली आहे. महिलेला सोन्याचे दागिने घातलेले पाहून आरोपीने तिला चहासाठी बोलावले आणि नंतर तिच्या डोक्यात प्रहार करून तिची हत्या केली. नंतर तिचा मृतदेह जाळण्यात आला.