सोलापूर, २ नोव्हेंबर (वार्ता.) – वेळापूर येथून मोठ्या प्रमाणात गोवंशियांची तस्करी होते, अशी माहिती गोरक्षकांना मिळाली होती. या माहितीनुसार सोलापूर येथील बजरंग दलाच्या गोरक्षकांनी अकलूज विभाग पोलिसांच्या साहाय्याने बोरगाव रस्ता येथे धाड टाकली असता ३ चारचाकी वाहने भरून गोवंशियांना क्रूरतेने भरलेले निदर्शनास आले. त्यातील काही गोवंश मृत अवस्थेत आढळले. तेथीलच एका पत्रा शेडमध्ये अनुमाने ७० ते ८० गोवंशियांना डांबून ठेवलेले निदर्शनास आले. गोरक्षकांनी एकूण २०५ गोवंशियांना कत्तलीपासून वाचवले. (जी माहिती गोरक्षकांना मिळते, ती पोलिसांना का मिळत नाही ? – संपादक)
तिन्ही वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत, तसेच जागेचा मालक आणि गोवंशियांचे मालक यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख श्री. प्रशांत परदेशी यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. या कारवाईत १४ लाख १३ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी बजरंग दल विभाग संयोजक सिद्राम चरकुपल्ली, पंढरपूर विभाग संयोजक आकाश धोत्रे, तसेच अन्य गोरक्षक यांनी परिश्रम घेतले.