इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची घोषणा !
तेल अविव (इस्रायल) – इस्रायल आणि हमास युद्ध आता दुसर्या टप्प्यात गेल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी घोषित केले. नेतान्याहू म्हणाले की, इस्रायलचे अतिरिक्त सैन्यबळ गाझामध्ये पोचले असून ते आतंकवाद्यांना भूमी, हवा आणि समुद्र अशा तीनही मार्गांद्वारे उद्ध्वस्त करील. हमासविरोधातील युद्ध म्हणजे इस्रायलचा दुसरा स्वातंत्र्यलढा असून त्यात आम्हीच विजयी होऊ.
नेतान्याहू पुढे म्हणाले,
१. मी हमासने अपहरण केलेल्या आणि युद्धात मृत्यू पावलेल्या इस्रायली कुटुंबियांना भेटलो. लोकांचे अपहरण करणे, हा मानवतेच्या विरोधातील गुन्हा आहे. अपहरण झालेल्या लोकांना परत आणण्यासाठी सरकार सर्व मार्गांचा अवलंब करणार आहे.
२. हा संघर्ष दीर्घकाळ चालणारा आणि कठीण असेल. इस्रायलचे सैन्य लढा देईल आणि मातृभूमीचे रक्षण करील.
३. सध्या ‘करा किंवा मरा’ अशी परिस्थिती आहे. ही परीक्षा असून त्याचा निकाल आम्हाला ठाऊक आहे. तो आमच्याच बाजूने असेल.
४. गाझात सैन्यमोहीम वाढवण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने एकमताने घेतला आहे. सैनिकांची सुरक्षितता आणि देशाचे भविष्य यांचा विचार करून संतुलितपणे ही कारवाई केली जाणार आहे.