कलियुगातील सर्वश्रेष्ठ नामजप साधना, नामजप वाणी आणि ध्वनी-प्रकाश विज्ञान

‘एप्रिल १९९७ मध्ये ‘नामजपाच्या ४ वाणींविषयी अभ्यासवर्ग घ्यावा’, असा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव डॉ. आठवले यांचा निरोप मला मिळाला. तेव्हा वाटले की, मला नामजपाच्या वाणीचे वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा हे ४ प्रकार ठाऊक आहेत. याखेरीज मला अन्य माहिती नाही आणि एवढी माहिती अभ्यासवर्ग घेण्यासाठी पुरेशी नाही. त्यामुळे प्रारंभी मी अभ्यासवर्ग घेण्यास नकार दिला. तेव्हा गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा मला परत निरोप आला, ‘हा अभ्यासवर्ग तुम्हाला घ्यायचाच आहे.’ त्यामुळे त्यांची इच्छा हीच आज्ञा समजून मी अभ्यासवर्ग घेण्याचे ठरवले. त्याकाळी मी एका जिल्ह्यात एका रुग्णालयामध्ये रुग्ण पहाण्यासाठी बसत असे. माझ्या ‘कन्सल्टेशन’ (समुपदेशनाच्या) खोलीमध्ये प.पू. भक्तराज महाराजांचे छायाचित्र लावलेले होते. तेथे बसलो असतांना मी त्यांच्याशी संवाद साधला. मी तक्रारीच्या सुरात त्यांना म्हणालो, ‘‘तुम्ही नामजपाविषयी केवळ ४ शब्द सांगितले आहेत. एवढ्या माहितीवर अभ्यासवर्ग कसा घेणार ?’’ त्या काळात मी डॉक्टर असल्याचा मला अधिकच अहंकार होता. त्यामुळे ‘नामजपाच्या वाणी आणि त्यांचे महत्त्व हे विज्ञान अन् वैद्यकीयशास्त्र यांनुसार सर्वांना समजवून सांगता यायला जमले, तरच ते सर्वांना कळेल’, असे मला वाटले होते.

२२ ऑक्टोबर २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘अध्यात्मशास्त्रानुसार मनुष्याचे देह आणि त्यांच्या नामजपाच्या वाणी’, यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. (भाग ३)

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

६. विज्ञान, वैद्यकीय विज्ञान आणि नामजपाद्वारे होणार्‍या चित्तशुद्धीची प्रक्रिया (साधनेद्वारे होणार्‍या आनंदप्राप्तीचे विज्ञान)

६ अ. कान हे ज्ञानेंद्रिय – ध्वनीला प्रकाशात रूपांतर करणारे यंत्र : त्यानंतर मी ज्ञान श्रुती स्वरूपात सांगणार्‍या त्या दिव्य विभूतीला विचारले, ‘नामजप साधना, आधुनिक विज्ञान, आधुनिक वैद्यकीय शास्त्र यांचा मनुष्याचे आरोग्य तथा मोक्षप्राप्ती यांच्याशी संबंध काय ?’ ते म्हणाले, ‘‘गडबड कशाला करतो, सर्व सांगीन.’’ असे म्हणून त्यांनी पुढे सांगायला प्रारंभ केला. त्यांनी मला विचारले, ‘‘तू कान-नाक-घसा तज्ञ आहेस ना ? तू शरीर क्रिया-विज्ञान (Physiology) शिकला आहेस ना ? मग सांग, मनुष्य नाद ऐकतो कि प्रकाश ?’’ मी पटकन सांगितले, ‘‘मनुष्य नाद ऐकतो.’’

त्यावर ते म्हणाले, ‘‘मनुष्य नाद ऐकतो, हा भ्रम आहे. मनुष्य प्रकाशभाषेत ऐकतो. शरिरात कान नावाचे एक यंत्र भगवंताने दिले आहे. हे यंत्र बाहेरून येणारा ध्वनी कानाच्या पडद्यावर आदळल्यानंतर कानांतील हाडांतून प्रवास करत तो नंतर आतल्या कानातील द्रवामध्ये कंपने निर्माण करून विद्युत् लहरींमध्ये परावर्तित करते. या विद्युत् लहरी, म्हणजेच प्रकाशस्वरूप ध्वनी होय ! हा प्रकाशस्वरूप ध्वनी मेंदूमार्फत आत्मा ग्रहण करतो. मेंदूमध्ये या जन्मासाठी, या योनीसाठी आवश्यक असलेले ज्ञान साठलेले असते. त्या आधारे आत्मा बाह्य जगतातील या संदेशाला ग्रहण करतो आणि मेंदूद्वारे तो अन्य ‘नर्व्हज’ (नसा)द्वारे त्याचा आवश्यक तो प्रतिसाद देतो. असे सर्वच ज्ञानेंद्रियांचे वेगवेगळे यांत्रिक कार्य विहित असते.

असेच गंध, रस, रूप आणि स्पर्श यांच्या संदर्भातही आहे. या संवेदना अनुक्रमे नाक, जिव्हा, डोळे आणि त्वचा यांद्वारे प्रारंभी स्थूल रूपात ग्रहण होतात. मज्जातंतूद्वारे त्या विद्युत् लहरींमध्ये परावर्तित होऊन मेंदूद्वारे आत्मा त्या प्रकाश स्वरूपात ग्रहण करतो आणि संवेदना समजून घेतो. एखादे ज्ञानेंद्रिय, संबधित मज्जातंतू किंवा मेंदूतील त्याची विशिष्ट जागा या काही व्याधी अथवा अपघात यांमुळे निकामी झाल्यास त्यांचे कार्य बंद होते. उदाहरणार्थ कुष्ठरोगात त्वचेची संवेदना कळत नाही, आजारपणात जिव्हा काही काळ कार्यरत नसल्यास तोंडाला चव नसते, डोळे निकामी झाल्यास दिसत नाही, इत्यादी.

६ आ. नाम कार्य कसे करते ? : आता नाम कार्य कसे करते ? ते पाहूया.

त्या दिव्य विभूतीने मला विचारले, ‘ध्वनी ऊर्जा किंवा प्रकाश ऊर्जा यांद्वारे तुम्ही काही व्याधी दूर करण्याचा प्रयत्न करता का ?’ मला लगेच लक्षात आले नाही. त्यांनी मला विचारले, ‘‘लिथोट्रिप्सी (‘शॉक वेव्हज’द्वारे मूत्रपिंडातील मूतखड्याचे तुकडे करणे) म्हणजे काय ? कॅन्सरवरील उपचारातील ‘रेडिएशन थेरपी’ म्हणजे काय ?’’ मला लगेच लक्षात आले. मी म्हणालो, ‘‘लिथोट्रिप्सीद्वारे किडनीमधील (मूत्रपिंडामधील) मोठ्या आकाराचा मूतखडा (स्टोन) तोडून त्याचे छोटे छोटे तुकडे  केल्याने तो नंतर निघून जातो, तसेच मूतखड्याचा मूत्रपिंडावर जो विपरीत परिणाम होत होता, तोही अल्प करता येतो. त्याचप्रमाणे ‘रेडीएशन’द्वारे कॅन्सरच्या पेशी जाळून टाकल्या जातात.’’

तेव्हा ते म्हणाले, ‘‘वैद्यकीय शास्त्रात जसे बाहेरून ऐकू न येणार्‍या ‘शॉक वेव्हज’द्वारे (शॉक वेव्ह म्हणजे ध्वनीचा रचनात्मक प्रकार) किंवा प्रकाश किरणांद्वारे (‘रेडिएशन्स’द्वारे) आरोग्यविषयक उपचार होतात, अगदी तसेच नामजप करणार्‍याला प्रारंभी ऐकू येणार्‍या नामजपातून निर्माण होणारी ध्वनी ऊर्जा, नंतर ऐकू न येणार्‍या नामजपातील ध्वनी-प्रकाश ऊर्जा आणि शेवटी केवळ प्रकाश ऊर्जा यांद्वारे आरोग्यविषयक आणि आध्यात्मिक लाभ मिळतात. या नैसर्गिक अथवा दिव्य ऊर्जेमुळे मनांतील विचार, संस्कार हळूहळू नष्ट होऊन मन संस्काररहित होते. परिणामी प्रारंभी स्वभावदोष आणि अंतिमतः अहंभाव नष्ट झाल्याने अनावश्यक विचार नष्ट होऊन मन निर्विचार होते. अर्थात् गुरुकृपायोगानुसार साधनेत नामजपासमवेत अष्टांग साधना सांगितली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया शीघ्रतेने होऊ शकते.’’

मनातील विचार हे ऐकू न येणार्‍या ध्वनी ऊर्जेत साठवलेले असतात. ते अल्ट्रासाऊंडपेक्षा सूक्ष्म; परंतु अत्यल्प प्रकाश ऊर्जेच्या स्वरूपात असतात. मध्यमा वाणीत नामजप चालू झाला की, मनाची स्थिरता अधूनमधून अनुभवता येते आणि पश्यंती वाणीतील नामजपामध्ये मन स्थिर होणे, समाधीची अनुभूती घेणे, अशी अवस्था प्राप्त होते.

या अवस्थेपर्यंत चित्त बहुतांश शुद्ध झालेले असते, तर केवळ संचित कर्म आणि देह प्रारब्धाविषयीचे संस्कार राहिलेले असतात. परावाणीत नामजप चालू असतो, तेव्हा चित्त पूर्णतः शुद्ध झालेले असते. केवळ समष्टीसाठी देहाचा वापर करत असलेल्या अशा उन्नतांचा देह पूर्णतः समष्टीच्या कल्याणार्थ झिजत असतो. त्यांना ना व्यष्टी, ना समष्टी प्रारब्ध उरलेले असते.

नामजपाद्वारे निर्माण होणार्‍या आंतरिक ध्वनी आणि प्रकाश ऊर्जा ही अत्यंत पूरक असून मनुष्याचे आरोग्य अन् आध्यात्मिक उन्नती दोन्ही साध्य करते. आधुनिक वैद्यकीय विज्ञान जे बाह्यध्वनी, प्रकाश अथवा औषधरूपी रासायनिक ऊर्जा वापरते, ती ऊर्जा मनुष्य तथा सृष्टीला पूरक नसल्याने एका व्याधीच्या उपचाराच्या वेळी दुसरी व्याधी निर्माण होणे, असे दुष्परिणाम दिसून येतात.

एकूणच नामजप ऊर्जा मनातील संस्कार नष्ट करून चित्तशुद्धीसाठी वापरली जाते. मनातील विचार आणि संस्कार हे मनुष्याला स्वतःच्या जीवनात आनंदप्राप्तीतील बाधा ठरतात, तर समष्टी जीवनात सामाजिक अनारोग्यास कारणीभूत असतात. जगातील सर्व आरोग्य समस्या तथा बाह्य कलह यांसाठी मनुष्यांतील रज-तमात्मक विचार आणि संस्कारच उत्तरदायी असतात. विश्वाला एका कुटुंबासारखे रहायचे असेल, तर सर्वांनी साधना करून चित्तशुद्धी केली पाहिजे. स्वतःतील दोष, अहंकार नष्ट केले पाहिजेत, तेव्हाच जग खर्‍या अर्थाने एका परिवाराप्रमाणे राहू शकेल. यावर कलियुगातील नामजप साधनेद्वारे मिळणारा दैवी नाद आणि प्रकाश ऊर्जा यांचा वापर हा सर्वांत सोपा अन् सहज करता येण्याजोगा प्रयत्न आहे.

एकूणच नाम कार्य कसे करते ? नामजप हा स्थूल ध्वनी, अव्यक्त ध्वनी, तसेच प्रकाश ऊर्जा यांद्वारे चित्तशुद्धी करून मनुष्याला आरोग्यच नव्हे, तर आनंदप्राप्तीचा मार्ग साध्य करून देणारा आहे. ही कलियुगातील सर्वश्रेष्ठ साधना ठरते. गुरुकृपायोगांतर्गत अष्टांग साधनेत नामजपासह स्वभावदोष आणि अहंकार निर्मूलन केल्याने, तसेच अन्य अष्टांग सूत्रे पूर्ण केल्याने याच जन्मात पूर्ण अरोग्य अन् आनंदप्राप्ती शक्य आहे, हे लक्षात येते. (समाप्त)

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (२५.१०.२०२३)   

आत्मा शरिराद्वारे बाह्य जगाशी समन्वय अन् संवाद साधत असतो.

मनुष्याचे शरीर हे विविध यंत्रांसह कारखाना असलेले आत्म्याचे वाहन असणे (पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये ही यंत्रे, तर पचनसंस्था ही कारखान्यासम असणे)

दिव्य ज्ञानदाते म्हणाले, ‘‘मनुष्याचे (नव्हे प्राणीमात्रांचे) शरीर विविध यंत्रांसह एक प्रचंड कारखाना स्वरूपातील आत्म्याचे वाहनच असते. पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये ही विविध यंत्रे असून पचनसंस्था ही एका अद्वितीय कारखान्यासम आहे. आत्मा या यंत्र आणि कारखाना रूपी शरिराद्वारे बाह्य जगाशी समन्वय अन् संवाद साधत असतो.

पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये ही यंत्रे

१. बाह्य संवेदना (५ प्रकारांच्या) : प्राणीमात्र, तसेच मनुष्य त्याच्या जन्म घेतलेल्या योनीनुसार असलेली क्षमता, ज्ञान, गुण यांनुसार बाह्य जगतातून केवळ ५ प्रकारच्या संवेदना ग्रहण करतात. आध्यात्मिक भाषेत त्यांना पंचमहाभूतात्मक संवेदना म्हणू शकतो. या बाह्य संवेदनांद्वारे मनुष्याच्या आंतरिक वृत्ती निर्माण होतात.

२. आंतरिक संवेदना : भाव, भावना या मनुष्यासह प्राणीमात्रांतील आंतरिक संवेदना असून त्या मन आणि बुद्धी यांद्वारे त्याच्या जन्म घेतलेल्या योनीनुसार असलेली क्षमता, ज्ञान, गुण आदींद्वारे आत्मा ग्रहण करत असतो. जन्मोजन्मीचे कर्म आणि संस्कार म्हणजेच वृत्तींतून या आंतरिक संवेदना निर्माण होतात.

३. ज्ञानेंद्रिये : प्राणीमात्र (आत्मा) त्याच्या जन्म घेतलेल्या योनीनुसार असलेली क्षमता, ज्ञान आणि गुण (मनुष्यातील संस्कार) यांनुसार उपलब्ध असलेल्या ज्ञानेंद्रियांच्या (मनुष्यातील पंचज्ञानेंद्रियांच्या) माध्यमातून बाहेरून येणार्‍या विविध पंचमहाभूतात्मक स्थूल संवेदनांना प्रकाशरूपात परावर्तित करून बाहेरील त्या क्षणाच्या स्थळ, काळ अन् व्यक्ती यांविषयीची माहिती प्रकाशज्ञान स्वरूपात ग्रहण करतो.

एक प्रकारे आधुनिक विज्ञानाच्या भाषेत हे ‘रिसिव्हर (इनपुट) एंटेना’प्रमाणे कार्य करतात. एक प्रकारे हे कर्म, म्हणजे ‘ॲक्शन’ ठरते.

बाह्य यंत्र कितीही भेदयुक्त असले, तरी सर्वत्र तोच आत्मा व्यापून आहे आणि हेच अद्वैत, हेच एकत्व !

४. कर्मेंदिये : प्राणीमात्र त्याच्या जन्म घेतलेल्या योनीनुसार असलेली क्षमता, ज्ञान, गुण (मनुष्य आपल्या संस्कारांनुसार) आदींच्या आधारे ज्ञानेंद्रियांद्वारे आलेल्या माहितीनुरूप कर्मेंद्रियांच्या (मनुष्य पंचकर्मेंद्रियांच्या) माध्यमांतून योग्य प्रतिसाद देतात. येथे आत्म्यातून आलेल्या प्रकाशरूपी ज्ञानाचे रूपांतर प्रथम मेंदूत होऊन त्याचे मज्जातंतूंद्वारे वहन होऊन अंतिमतः स्थूल कर्मात रूपांतरित होते आणि प्रतिसादाचे कर्म घडते.

एक प्रकारे आधुनिक विज्ञानाच्या भाषेत याला ‘प्रतिसाद’  (रिस्पॉन्स) म्हणतात. एक प्रकारे हे कर्म, म्हणजे आत्म्याला मिळालेल्या माहितीरूपी ‘ॲक्शन’वरील ‘रिॲक्शन’ (क्रियेवरील प्रतिक्रिया) असते.

५. कानाने ऐकण्याची अंतर्गत प्रक्रिया आणि भ्रमणभाषवरून दूरस्थ मनुष्याशी संवाद साधून देणारी विज्ञानाची बाह्य विश्वातील प्रक्रिया : वर्तमानात आधुनिक विज्ञानाद्वारे निर्मित भ्रमणभाष किंवा दूरध्वनी यांद्वारे बोलतांना मनुष्याच्या बोलण्यातील ऐकू येणार्‍या ध्वनी ऊर्जेचे मनुष्याला ऐकू न येणार्‍या विद्युत्-चुंबकीय ऊर्जेत रूपांतर होऊन ते प्रथम उपग्रहाकडे प्रक्षेपित होते. नंतर उपग्रह त्या विद्युत्-चुंबकीय लहरींना परावर्तित करून ज्याला संपर्क केला आहे, त्याच्या भ्रमणभाष क्रमांकावर पाठवतो. ऐकणार्‍या मनुष्याचा भ्रमणभाष किंवा दूरध्वनी त्या विद्युत् चुंबकीय लहरींना ग्रहण करून त्यांचे मनुष्याला ऐकू येणार्‍या ध्वनी ऊर्जेत रूपांतर करतो, तेव्हा मनुष्य ते ऐकू शकतो. एक प्रकारे कानाचे कार्य असेच आहे, हे आपण लेखाच्या पहिल्या सूत्रात ‘कान हे ज्ञानेंद्रिय – ध्वनीला प्रकाशात रूपांतर करणारे यंत्र’ यामध्ये पाहिले.

आधुनिक विज्ञानाचे हे तंत्रज्ञान जसे एकमेकांपासून सर्वदूर असलेल्या व्यक्तींना क्षणात एकमेकांशी संवाद साधणे शक्य करते, तसेच आधुनिक विज्ञानाचे तंत्रज्ञान अनंत काळापासून भगवंताने आधीच मनुष्याच्या शरिरात ‘कान’ नावाच्या यंत्राद्वारे राबवले आहे, ही ईश्वराची दिव्यता लक्षात घेतली पाहिजे.

६. पचनसंस्था – एक अद्वितीय परमात्मानिर्मित देहरूपी कारखाना ! : ती विभूती पुढील ज्ञान देतांना म्हणाली, ‘‘एकाच प्रकारचा कच्चा माल घालून विविध प्रकारची उत्पादने एकाच कारखान्यात निर्माण केली जातात, असा एखादा कारखाना तुम्ही पाहिला आहे का ?’’ मी म्हणालो, ‘‘नाही. एकाच प्रकारचा कच्चा माल घालून एकाच प्रकारचे उत्पादन घेणारा कारखाना मी पाहिला आहे.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘मनुष्याचा देह हे अनेक यंत्र आणि कारखानासम आहे. मनुष्याची पचनसंस्था हा परमात्म्याचा एवढा दिव्य कारखाना आहे की, यात एकाच प्रकारचा कच्चा माल घालून शरिराला हवे ते उत्पादन दिले जाऊ शकते. कुणी शाकाहारी, मांसाहारी, फलाहारी असू शकतो; परंतु शरिरात अन्न गेल्यानंतर सर्वांना जगण्यासाठी ऊर्जा लाभते, हवे ते अन्नरस बनतात, हवे ते ‘हार्माेन्स’ (संप्रेरके) बनतात, हवे ते रक्त बनते, हवे ते मास, हाडे, आणि अन्य जीवनावश्यक शरीर क्रियेसाठी लागणार्‍या पंचमहाभूतात्मक वस्तू शरीर निर्माण करते. विज्ञानाने औद्योगिकीकरण केले; परंतु एकाच कच्च्या मालातून हवे ते उत्पादन हवे तेव्हा निर्माण करण्याची क्षमता अद्याप विज्ञानाकडे नाही आणि भगवंतरूपी प्रकृतीने दिलेले हे शरीर ते करून दाखवत आहे.

एकूणच ८४ लक्ष योनींमध्ये आत्म्याचे काळानुरूप, योनीरूप लाभलेले विविध शरीररूपी वाहन, हे त्याचे बाह्यविश्वाशी समन्वय आणि संवाद करण्याचे यंत्र आहे. बाह्य यंत्र कितीही भेदयुक्त असले, तरी सर्वत्र तोच आत्मा व्यापून आहे आणि हेच अद्वैत, हेच एकत्व ! बाह्य यंत्रे बिघडतील, नादुरुस्त होतील, जीर्ण होतील, त्यांचा त्याग करावा लागेल; कारण ते अशाश्वत पंचमहाभूतात्मक आहेत; मात्र आत बसलेला जीव हा जीवात्मा, आत्मा, परमात्मा म्हणजे चेतना आहे, शाश्वत आहे, अविनाशी आहे, सर्वव्यापी आहे, सर्वज्ञ आहे, सर्वशक्तीमान आहे. हेच अंतिम सत्य, हेच आपले स्वस्वरूप, हेच अनादी अनंत !

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (२५.१०.२०२३)