चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील पवित्र दत्तपिठाला इस्लामी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी श्रीराम सेनेचे उद्यापासून ‘दत्तमाला अभियान’ !

मध्यभागी श्रीराम सेनेचे पदाधिकारी श्री. आनंद शेट्टी अड्यार

मंगळुरू (कर्नाटक) – चिक्कमगळुरू येथील दत्तपीठ इस्लामी अतिक्रमणापासून मुक्त करण्यासाठी श्रीराम सेनेच्या वतीने संपूर्ण राज्यात ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत ‘दत्तमाला अभियान’ होणार आहे, अशी माहिती श्रीराम सेनेचे पदाधिकारी श्री. आनंद शेट्टी अड्यार यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

श्री. आनंद शेट्टी अड्यार पुढे म्हणाले की, श्रीराम सेना गेल्या १९ वर्षांपासून दत्तपिठाच्या मुक्तीसाठी आंदोलन करत आहे. ‘दत्तपीठ’ हे ‘हिंदु पीठ’ म्हणून घोषित करून तेथे असलेली अनधिकृत थडगी बाबा बुडन दर्ग्यात स्थलांतरित करावीत. दत्तपीठ धर्मादाय खात्याकडे असल्याने तेथील उरूस बंद करावा. साधू-संतांना दर्शनाची मुक्त संधी द्यावी आणि तेथे येणार्‍या भक्तांसाठी नित्य प्रसादव्यवस्था, यात्रा निवास, होम-हवन इत्यादी धार्मिक कार्यक्रमांना अनुमती देण्यात यावी. या मागण्या पूर्ण होण्यासाठी श्रीराम सेनेकडून ‘दत्तमाला अभियान’ राबवण्यात येणार आहे.

३० ऑक्टोबरला दत्तमाला धारण करणे, २ नोव्हेंबरला दत्त दीपोत्सव, ४ नोव्हेंबरला भिक्षा मागणे, ५ नोव्हेंबरला चिक्कमगळुरू येथे शोभायात्रा, धर्मसभा, दत्तपीठ येथे पादुका दर्शन, होम-हवन होणार आहे. या अभियानासाठी दक्षिण कन्नड जिल्ह्यातून सहस्रो भक्त सहभागी होणार असल्याचे श्री. आनंद शेट्टी अड्यार यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका 

इस्लामी आक्रमकांनी कह्यात घेतलेली देशभरातील हिंदूंची धार्मिक स्थळे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही हिंदूंना मुक्त करता न येणे लज्जास्पदच होय !