अमेरिकेकडून सीरियातील इराणी सैन्याची २ ठिकाणे आक्रमण करून नष्ट !

वॉशिंग्टन (अमेरिका) – इराक आणि सीरिया येथील अमेरिकी सैनिकांवर सतत होणार्‍या आक्रमणांमुळे अमेरिकेने सीरियातील इराणच्या सैन्याच्या २ ठिकाणांवर हवाई आक्रमण करून ती नष्ट केली. इराणचे ‘इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ आणि इराणचे समर्थन असलेले गट, यांची ही ठिकाणे होती.

अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉईड ऑस्टिन यांनी २६ ऑक्टोबर या दिवशी म्हटले होते की, अमेरिकेला कोणताही संघर्ष नको आहे; मात्र इराणचे समर्थन असलेल्या गटांकडून अमेरिकेच्या सैनिकांवर आक्रमणे केली जात आहेत. ती सहन केली जाणार नाहीत. ती थांबवली पाहिजेत. इराण अमेरिकी सैन्यावरील या आक्रमणांमध्ये त्यांचा सहभाग लपवू इच्छित आहे; मात्र आम्ही त्यांना सोडणार नाही. जर इराणचे समर्थन असलेल्या या गटांकडून आक्रमण होतच राहिली, तर आम्ही आमच्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी पुढील पाऊल उचलण्यासाठी संकोच करणार नाही, अशी चेतावणी त्यांनी दिली.

ऑस्टिन म्हणाले की, अमेरिकेच्या सैनिकांवर आक्रमण करणारे गट वेगळे आहेत. सध्या चालू असलेल्या इस्रायल-हमास युद्धाशी त्याचा संबंध नाही. यामुळे अमेरिकेची इस्रायल-हमास युद्धावरील भूमिका पालटणार नाही.