हमासनेच ओलिसांना ठार मारल्याचा इस्रायलचा आरोप
तेल अविव (इस्रायल) – हमासची सैन्य शाखा अल् कासिम ब्रिगेडने तिच्या टेलिग्राम चॅनेलवर एक निवेदन प्रसारित केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, इस्रायलने केलेल्या हवाई आक्रमणामध्ये ओलीस ठेवलेले ५० इस्रायली ठार झाले आहेत. ‘अल् जझीरा’ या वृत्तवाहिनीने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. हमासचा प्रवक्ता अबू उबैदा याने अल् कासिम ब्रिगेडच्या निवेदनाला दुजोरा दिला आहे. दुसरीकडे इस्रायली गुप्तचर अधिकार्यांनी सांगितले की, हमासनेच ५० ओलिसांना ठार मारले असून ती इस्रायली सैन्यावर आरोप करत आहे.
गाझातील आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गाझा पट्टीत आतापर्यंत ७ सहस्राहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी गेला आहे. वर्ष २०१४ मध्ये गाझात झालेल्या युद्धात जितकी हानी झाली होती, त्यापेक्षा अधिक हानी या वेळी झाली आहे. वर्ष २०१४ च्या युद्धापेक्षा ३ पट अधिक लोक या युद्धात मारले गेले आहेत. वेस्ट बँकमध्ये १०० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी गेला आहे.
इस्रायली सैन्याने सांगितले की, त्यांच्या लढाऊ विमानांनी दराज तुफाह बटालियन येथे हमासच्या ३ वरिष्ठ आतंकवाद्यांना ठार मारले आहे.