तुमच्यावर आक्रमण झाले असते, तर तुम्ही आमच्यापेक्षा अधिक शक्तीने प्रत्युत्तर दिले असते ! – इस्रायल

हमासचा निषेध करणार्‍या प्रस्तावाला रशिया, चीन आणि संयुक्त अरब अमिरात यांनी विरोध केल्यावर इस्रायलने फटकारले !

इस्रायलचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत

न्यूयॉर्क (अमेरिका) – आम्ही इस्रायलमध्ये आमच्या अस्तित्वाची लढाई लढत आहोत. तुमच्यापैकी कुणाच्याही देशात असे हत्याकांड झाले असते, तर मला निश्‍चिती आहे की, तुम्ही इस्रायलपेक्षा अधिक शक्तीने प्रत्युत्तर दिले असते, अशा शब्दांत इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत रशिया, चीन, संयुक्त अरब अमिरात या देशांना फटकारले. अमेरिकेने सुरक्षा परिषदेत हमासने इस्रायलवर केलेल्या आक्रमणाचा निषेध करणारा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला १० देशांनी पाठिंबा दिला, तर वरील ३ देशांनी विरोधात मतदान केले. त्यावरून इस्रायलच्या संयुक्त राष्ट्रांतील राजदूताने या देशांना वरील शब्दांत फटकारले.

इस्रायलच्या राजदूताने म्हटले की, हमासने अत्यंत अमानवीय कृत्य केले आहे. असे अत्याचार पुन्हा होऊ नयेत; म्हणून या आतंकवाद्यांच्या विरोधात कठोर सैन्य कारवाई व्हायला हवी, याविषयी तुमच्या मनात कोणतीही शंका असायला नको.

संपादकीय भूमिका

  • जिहादी आतंकवादी संघटनांच्या पाठीशी उभे रहाणारे देश जगाला संकटातच टाकत आहेत. अशा देशांवर कधी संकट आले, तर अन्य देश कधीतरी त्यांना साहाय्य करतील का ?
  • स्वतःच्या देशात जिहादी आतंकवादी निर्माण होऊ नयेत; म्हणून १० लाख उघूर मुसलमानांना छावण्यांमध्ये ठेवणारा चीन आणि युक्रेनवर आक्रमण करणारा रशिया यांना इस्रायलला विरोध करण्याचा अधिकार आहे का ?