दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी लहान-मोठे सर्वच जण सर्रास फटाके वाजवतात. लक्षात घ्या की, आनंद साजरा करण्यासाठी फटाक्यांची आवश्यकता नसते. ध्वनीप्रदूषण आणि वायूप्रदूषण करणारे फटाके हे स्वतःला आणि इतरांनाही त्रासदायकच असतात. इतरांना त्रास देऊन उत्सव साजरा करणे, हे हिंदु धर्मात निंद्य मानले आहे. दिवाळीच्या दिवसांत योग्य रीतीने धर्माचरण करूनच खरा आनंद अनुभवता येतो. आपणही याची अनुभूती अवश्य घेऊ शकता. यासाठी फटाके न वाजवता धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे दिवाळीचा सण साजरा करा.
देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके फोडणे, हे पाप अन् गंभीर गुन्हाच !
१. आजकाल बाजारात श्री लक्ष्मी, श्रीकृष्ण, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक इत्यादी राष्ट्रीय महापुरुषांची चित्रे छापलेले फटाके सर्रासपणे विकले जातात. असे फटाके फोडल्यानंतर त्यावर छापलेल्या देवता आणि महापुरुष यांच्या चित्रांच्या चिंधड्या चिंधड्या होऊन रस्त्यावर पसरतात. देवता किंवा महापुरुष यांच्या चित्रांचे हे तुकडे आपल्या पायदळी किंवा वाहनांखाली येतात. तसेच हवेत उडून कचर्यामध्ये किंवा नाल्यामध्ये पडलेले आढळतात. यामुळे देवतांचा घोर अनादर आणि महापुरुषांचा अपमान होतो.
२. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी एकीकडे आपण तिची पूजा करतो, तर दुसरीकडे तिचा अनादर करतो. देवतांची चित्रे असलेले फटाके फोडल्यास आपल्यावर देवतेची कृपा होईल कि अवकृपा ? याचा प्रत्येक हिंदूने विचार करायला पाहिजे. देवतांचा अनादर करणे, हे पापच आहे आणि हे पाप आपण कळत-नकळतपणे प्रतिवर्षी करत असतो.
३. भारतीय दंड संहितेनुसार देवतांच्या अनादराला धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गंभीर गुन्हा मानला गेला आहे. त्यामुळे असे फटाके स्वतः करेदी करू नयेत आणि इतरांचे याविषयी प्रबोधन करावे. जे अशा प्रकारचे फटाके विकत आहेत किंवा सिद्ध करत आहेत, त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याविषयी गुन्हे नोंद करण्याची नितांत आवश्यकता आहे.
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.
चिनी फटाके : केवळ प्रदूषणकारी नाही, तर भारतविरोधी शस्त्र !
१. भारतात पसरलेल्या चीनी वस्तूंच्या व्यापारात चीनी फटाकेही मोठ्या प्रमाणात आले आहेत. या फटाक्यांमध्ये ‘पोटॅशियम क्लोरेट’ आणि ‘पोटॅशियम पेराक्लोरेट’ या विषारी रसायनांचे मिश्रण असते. या रसायनांचा उपयोग करण्यास भारतात बंदी घालण्यात आली आहे. या स्वस्त मिश्रणामुळे चीनी फटाके पुष्कळ स्वस्त; परंतु पुष्कळ प्रदूषणकारी असतात.
२. भारत सरकारने चीनी फटाक्यांवर या दीपावलीच्या वेळी बंदी घातली आहे. ‘एक्सप्लोसिव्ह एक्ट २००८’नुसार विदेशी स्फोटक पदार्थ ठेवणे आणि त्यांची विक्री करणे दंडनीय अपराध आहे. या वर्षी मध्यप्रदेश सरकारनही चीनी फटाक्यांवर प्रतिबंध लावला आला, तरीही चिन्यांनी अवैध मार्गाने भारतात असे फटाके आणून ते त्यांची विक्री करत आहेत, हे पुनःपुन्हा उघडकीस आले आहे. त्यामुळे सर्वांसाठी घातक आणि भारतीय अर्थव्यवस्थेला दुर्बळ बनवणार्या फटाक्यांवर प्रत्येक भारतीय नागरिकाने दृढतेने बहिष्कार घातला पाहिजे.
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.
फटाक्यांमुळे निर्माण झालेले विषारी वायू शोषण्याची क्षमता झाडांमध्ये नसल्याने ते टाळणे हाच एकमेव उपाय !
आज बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाके फोडून कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जातो. खरेतर फटाके हे मानवाच्या आरोग्यासाठी घातक आहेत. फटाक्यांमधून होणारे प्रदूषण हे विनाशकारी आहे. सर्वांत वाईट गोष्ट, म्हणजे फटाक्यांचे प्रदूषण झाडे लावून अल्प होऊ शकत नाही. फटाके फोडण्यातून निर्माण होणारा धूर कागद, लाकडे किंवा काडीकचरा यांच्या धुरासारखा साधा नसतो. कागद, लाकडे, काडीकचरा जाळला, तर त्यातून केवळ कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो की, जो वायू झाडाचे अन्न आहे. त्यामुळे भरपूर झाडे लावली की, हे प्रदूषण न्यून होऊ शकते. प्रत्येक माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत श्वासोच्छ्वासाच्या प्रक्रियेतून कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन करतच असतो. या प्रदूषणातून आपल्याला झाडेच सोडवतात; परंतु फटाक्यांच्या ज्वलनात सल्फर आणि कार्बनयुक्त अनेक विषारी वायू अन् धातू निर्माण होतात. आवाज न करणारे शोभेचे फटाके, तर अधिक विषारी वायू निर्माण करतात.
दुर्दैवाने कुठल्याही फटाक्यांनी सिद्ध केलेले विषारी वायू शोषण्याची क्षमता झाडांमध्ये नाही; म्हणूनच फटाक्यांना ‘नाही’ म्हणण्याखेरीज आपल्याकडे पर्याय नाही.
फटाके अन् डिजे, हे नव्हे प्रतीक धर्माचे ।
हे शोध परक्यांचे, तेही काल परवाचे ।।
धर्म म्हणजे स्मरण नित्य ईश्वराचे ।
ठेवावे ते भान सकलांच्या आरोग्याचे ।।
– वैद्य सुचित्रा कुलकर्णी, एम्.डी. (आयुर्वेद), बी.ए. (योगशास्त्र (सुवर्णपदक))
(साभार : ‘आरोग्यदूत’ व्हॉट्सॲप गट’ आणि ‘मराठीसृष्टी’ संकेतस्थळ)