संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस गुटरेस यांनी त्यागपत्र द्यावे !- इस्रायलची मागणी  

गुटरेस यांनी इस्रायलवर अप्रत्यक्ष केली होती टीका !

इस्रायलचे राजदूत गिलार्ड इर्डन व संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटरेस

न्यूयॉर्क (अमेरिका) – इस्रायलने संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटरेस यांच्या त्यागपत्राची मागणी केली आहे. गुटरेस यांनी म्हटले होते की, हमासने इस्रायलवर  विनाकारण आक्रमण केले नसणार. पॅलेस्टाईनचे नागरिक गेल्या ५६ वर्षांपासून पारतंत्र्याचा सामना करत आहेत. हमासने इस्रायलवर केलेल्या आक्रमणाचे समर्थन केले जाऊन शकत नाही; मात्र इस्रायलने पॅलेस्टिनी नागरिकांना दिलेल्या ‘सामूहिक शिक्षे’चे समर्थनही करता येणार नाही.

संयुक्त राष्ट्रांतील इस्रायलचे राजदूत गिलार्ड इर्डन यांनी म्हटले की, गुटरेस यांना मुले, महिला आणि वृद्ध यांच्या सामूहिक हत्यांविषयी जी ‘समज’ दाखवली आहे, त्यावरून ते या पदावर राहून नेतृत्व करण्याच्या पात्रतेचे नाहीत. त्यांनी त्वरित त्यागपत्र दिले पाहिजे. अशांसमवेत चर्चा करूनही काही उपयोग नाही.