महिषासुरमर्दिनी स्तोत्र ऐकतांना ‘जगभरातील लोक हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्याशी अंतरात्म्यातून जोडलेले आहेत’, असे वाटणे

कु. रजनीगंधा कुर्‍हे

१. ‘यू ट्यूब’वर महिषासुरमर्दिनी स्तोत्र ऐकून सर्व पंथांच्या लोकांनी चांगले अभिप्राय देणे 

‘२२.९.२०२३ या गौरी पूजनाच्या दिवशी रात्री मी ‘यू ट्यूब’वर ‘महिषासुरमर्दिनी स्तोत्र’ ऐकत होते. तेव्हा माझे तेथील अभिप्राय लिहिण्याच्या सदराकडे (‘कॉमेंट सेक्शन’कडे) लक्ष गेले. तेथे मुसलमान, ख्रिस्ती, बौद्ध, तसेच आंतरराष्ट्रीय देशातील काही लोकांचे अभिप्राय होते. त्यात त्यांनी लिहिले होते की, ‘महिषासुरमर्दिनी स्तोत्रातील शब्दांचा अर्थ कळत नसूनही हे स्तोत्र ऐकतांना मनाला अपूर्व शांती वाटते.’ काहींनी लिहिले होते, ‘मी बौद्ध असूनही ‘मला हे स्तोत्र ऐकू नये’, असे वाटले नाही; वास्तविक हे स्तोत्र ऐकल्यावर मला ताण आणि चिंता यांपासून मुक्त झाल्यासारखे वाटले. तसेच अनेक मुसलमानांनी लिहिले होते की, ‘आम्ही मुसलमान असूनही हे स्तोत्र आमचे आवडते आहे’, असे विविध अभिप्राय मी वाचले. त्यात सगळ्यांनी त्या स्तोत्राबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती.

२. ‘जगभरातील विविध पंथ आणि संप्रदाय यांत विखुरलेल्या लोकांना ‘भारतातील हिंदु धर्म अन् संस्कृती यांच्यामुळे आत्मशांतीची नाळ जोडली आहे’, असे वाटणे

तेव्हा माझ्या मनात पुढील विचार आला, ‘आपली नाळ ज्या ठिकाणी आपण जन्म घेतो, त्या ठिकाणाशी जोडलेली असते. त्यामुळे आयुष्यात कधीही कुठल्याही वयात आपण जन्म ठिकाणी गेल्यावर आपल्याला तेथे व्यतीत झालेले बालपण, त्या वेळच्या आठवणी इत्यादी सगळे आठवते आणि तेथील सगळे आपलेच वाटते.’ त्याचप्रमाणे जगभरातील विविध पंथांत विखुरलेल्या लोकांना ‘भारतामध्ये त्यांच्या आत्मशांतीची नाळ जोडली आहे’, असे वाटते. ते कुठल्याही पंथाचे असले, तरी त्यांना ‘भारत आणि तेथील संस्कृती यांबद्दल अंतरात्म्यातून स्वतःची नाळ जोडलेली आहे’, असे वाटते; म्हणूनच ‘भारत हा न केवळ विश्वगुरु आहे, तर तो जगभरातील लोकांची मायभूमीही आहे’, असे वाटून ते मनःशांतीसाठी भारतात येतात. त्यामागे भारताचा सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती आहे. अनादी काळापासून मनुष्य हिंदु धर्माचाच अंश असल्याने त्या धर्माच्या संस्कृतीकडे मनुष्याची आंतरिक ओढ असणे स्वाभाविकच वाटते. अशा भारतभूमीमध्ये मला देवाने जन्माला घातले आणि साधनेचा मार्ग दाखवला’, यासाठी माझे मन अंतःकरणापासून कृतज्ञताभावाने दाटून आले.’

– कु. रजनीगंधा कुर्‍हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.९.२०२३)