सोलापूर, बीड, धाराशिव जिल्ह्यांत ‘मी सनातन धर्म रक्षक’विषयक व्याख्यानांचा १ सहस्र १०० हून अधिक धर्मप्रेमींनी घेतला लाभ !
सोलापूर : सनातन धर्माविषयी ‘हेट स्पीच’द्वारे (द्वेषपूर्ण वक्तव्य) गरळ ओकणारे साम्यवादी तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलीन, काँग्रेसचे प्रियांक खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे समर्थन करणारे पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात सरकारने गुन्हे नोंद करून कठोर कारवाई करावी. नक्षलवादी, हिंदु धर्मद्वेष्टे यांना कायदेशीर मार्गाने विरोध केल्याविना ‘सनातन धर्मरक्षक’ शांत बसणार नाहीत, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी काढले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील सुशील रसिक सभागृह येथे आयोजित केलेल्या ‘मी सनातन धर्मरक्षक’ या कार्यक्रमात ते बोलत होते. समितीच्या वतीने तुळजापूर (जिल्हा धाराशिव), बीड, परळी (जिल्हा बीड), अकलूज (जिल्हा सोलापूर) या ठिकाणीही ‘मी सनातन धर्मरक्षक’ या विषयावर श्री. शिंदे यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानांचा १ सहस्र १०० हून अधिक धर्मप्रेमींनी लाभ करून घेतला.
श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले की,
१. सनातन हिंदु धर्म हा एकमेव प्राचीन धर्म आहे. हिंदु धर्मियांनी कधीही ना कुणावर आक्रमण केले, ना कुणाच्या हत्या केल्या. सनातन धर्म नष्ट करून धर्मद्वेष्ट्यांना हिंदूंची प्राचीन संस्कृती, परंपरा नष्ट करायची आहे. त्यांचे कुटील कारस्थान ओळखून समस्त हिंदूंनी सतर्क होऊन संघटितपणे या विरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे. ‘भारत तेरे टुकडे होंगे’, असे म्हणणारे कन्हैया कुमार, उमर खालिद, महंमद अफझल यांसारख्या आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ गळे काढणारे साम्यवादी हिंदु धर्मावर शिंतोडे उडवणारे अर्बन नक्षलवादी हेच सनातन धर्माचे खरे शत्रू आहेत.
२. मुसलमान आणि ख्रिस्ती यांचे लांगूलचालन करून हिंदूंना नष्ट करू पहाणार्यांना संघटित हिंदु कायदेशीर मार्गाने धडा शिकवल्याविना शांत बसणार नाहीत. हिंदूंचे सण, धार्मिक परंपरा यांवर टीका करणे, प्रदूषणाच्या नावाखाली श्री गणेशमूर्ती विसर्जनास विरोध करणारे वर्षाचे ३६५ दिवस होणार्या नद्यांच्या प्रदूषणाकडे हेतूपुरस्सर डोळेझाक करतात, तसेच अन्य पंथियांच्या कुप्रथांनाही विरोध करणे टाळतात.
३. मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतांना ‘मी सर्व धर्मांशी समान वागेन’, अशी प्रतिज्ञा घेतलेली असते; मग ते ‘सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया कसे म्हणू शकतात ?’ त्यामुळे प्रत्येक हिंदूने सजग होऊन धर्मद्वेष्ट्यांची ही आक्रमणे कायदेशीर मार्गाने हाणून पाडावीत.
विशेष
१. या वेळी श्री. रमेश शिंदे यांनी ‘सनातन धर्मावरील षड्यंत्र’ हा विषय प्रोजेक्टरच्या माध्यमातून विशद केला.
२. कार्यक्रमानंतर ठिकठिकाणी झालेल्या चर्चासत्रांत उपस्थितांनी सनातन धर्माविषयी ‘हेट स्पीच’ देणार्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रिवष्ट करणार असल्याचे सांगितले.
३. कार्यक्रमाला उपस्थित तीनही जिल्ह्यांतील अधिवक्ता, हिंदुत्वनिष्ठ, वाचक, उद्योजक, व्यापारी यांनी ‘मी सनातन धर्मरक्षक आहे’, अशी प्रतिज्ञा केली, तसेच सनातन धर्माचे रक्षण करण्याचा निश्चय केला.
४. या कार्यक्रमाला सनातन संस्थेच्या पू. (कु.) दीपाली मतकर यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली.
५. कार्यक्रमांना उपस्थित धर्मप्रेमींनी ‘मी सनातन धर्मरक्षक’ म्हणून कार्य करण्यासाठी सिद्ध असल्याचे दोन्ही हात वर करून अनुमोदन दिले.