१ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात ‘अॅप’ होणार कार्यरत !
मुंबई, १९ ऑक्टोबर (वार्ता.) – यापुढे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले राज्य आणि प्रमुख जिल्हा मार्ग यांवरील खड्ड्यांची ऑनलाईन तक्रार करता येणार आहे. तक्रार केल्यावर ३-४ दिवसांत रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेवले आहे. १ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये रस्ता दुरुस्तीचे तक्रार निवारण ‘अॅप’ कार्यरत होणार आहे.
१. यापूर्वी केंद्रशासनाकडून ‘पंतप्रधान ग्रामीण सडक योजने’च्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या रस्त्यांसाठी अशा प्रकारच्या तक्रारी स्वीकारल्या जात आहेत; मात्र राज्य पातळीवरील रस्त्यांविषयीच्या तक्रारींसाठी अशा प्रकारचे ‘अॅप’ प्रथमच बनवण्यात आला आहे.
२. ‘पी.सी.आर्.एस्. पीएब्लूडी महाराष्ट्र’ असे या ‘अॅप’चे नाव आहे. तक्रार करण्यासाठी नागरिकांना हे ‘अॅप’ डाऊनलोड करावे लागेल. या ‘अॅप’वर केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांविषयीच तक्रार करता येणार आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषद किंवा राष्ट्रीय महामार्ग यांविषयीची तक्रार हे ‘अॅप’ स्वीकारणार नाही.
३. तक्रार मिळाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थानिक पातळीवरील कार्यालयातील शाखा अभियंता संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याची दुरुस्ती करून घेईल. ठेकेदारासमवेत झालेला करार संपुष्टात आला असल्यास हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूर्ण केले जाईल.
४. तक्रारीनंतरही शाखा अभियंत्याकडून रस्त्याची दुरुस्ती झाली नाही, तर जिल्हा पातळीवरील अधिकारी याची नोंद घेतील.
५. ‘अॅप’वर झालेली तक्रार एकाच वेळी स्थानिक पातळीवरील अधिकार्यांपासून ते मंत्रालयातील अधिकार्यांपर्यंत कळू शकणार आहे. त्यामुळे ‘तक्रार कोणत्या दिवशी प्रविष्ट केली ?’, ‘किती दिवसांत त्याची पूर्तता झाली नाही ?’, हे समजेल.
६. ‘सद्य:स्थितीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ‘अॅप’वर प्रविष्ट केलेली तक्रार स्वीकारली जात आहे ना ?’, याची चाचपणी चालू असून ती यशस्वी झाली आहे.