गाझा पट्टीतील लोकांना साहाय्य करण्यासाठी इजिप्त राफा सीमा उघडणार !

अमेरिकेने गाझासाठी जाहीर केले १०० मिलियन डॉलरचे (८३२ कोटी रुपयांचे) साहाय्य !

इजिप्त राफा सीमा

तेल अविव (इस्रायल) – इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध चालू होऊन १३ दिवस झाले आहेत. अशातच इस्रायलचा दौरा आटोपून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्याशी चर्चा केली. अल-सिसी यांनी गाझाला मानवतावादी साहाय्य घेऊन जाणारे अनुमाने २० ट्रक पाठवण्यासाठी राफा सीमा उघडण्यास अनुमती दिली आहे. नेतान्याहू यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार इस्रायल सरकारने अन्न, पाणी आणि औषधांचा पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी गाझा पट्टीशी जोडलेली राफा सीमा वापरली जाणार आहे.

अमेरिकेला परतण्यापूर्वी जो बायडेन यांनी गाझाला मानवतावादी साहाय्यासाठी १०० मिलियन डॉलरचे (८३२ कोटी रुपयांचे) आश्‍वासन दिले. हे साहित्य हमासच्या हाती लागणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इस्रायल सोडताच हमासची आक्रमणे पुन्हा होऊ लागली.

दुसरीकडे सौदी अरेबियाने लेबनॉनमध्ये उपस्थित असलेल्या त्याच्या नागरिकांना लेबनॉन तात्काळ सोडण्यास सांगितले आहे.