अमेरिका इस्रायलच्या समवेत आहे, हे जगाला दाखवायचे होते ! – जो बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन इस्रायलच्या दौर्‍यावर !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू

तेल अविव (इस्रायल) – मला स्वतः येथे येऊन दाखवायचे होते की, आम्ही इस्रायलसमवेत आहोत. हमासने इस्रायलच्या लोकांची निर्घृण हत्या केली आहे. ते इस्लामिक स्टेटपेक्षा वाईट आहेत. इस्रायलला स्वतःचा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यासाठी अमेरिका त्याला सर्वतोपरी साथ देईल. आम्ही आमचे वचन पाळत आहोत, अशा शब्दांत इस्रायलमध्ये पोचलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलला पाठिंबा दिला. बायडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतली.

नेतान्याहून म्हणाले की, हमासने एका दिवसात १ सहस्र ४०० हून अधिक इस्रायली नागरिकांची हत्या केली. इस्रायलसाठी सध्या चांगली गोष्ट म्हणजे त्याचा खरा मित्र अमेरिका त्याच्या पाठीशी उभा आहे.

रुग्णालयावरील आक्रमण हे इस्रायलचे काम नाही ! – जो बायडेन

पत्रकारांनी बायडेन यांना गाझा शहरातील रुग्णालयावरील आक्रमणाविषयी विचारणा केल्यावर ते म्हणाले की, माझ्या माहितीनुसार हे काम इस्रायलचे नसून दुसर्‍याचे आहे; मात्र असे अनेक लोक आहेत, ज्यांना यावर विश्‍वास बसत नाही.