‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्वनीचित्रीकरणाच्या सेवेशी संबंधित साधक, म्हणजे गुणांची खाणच आहे’, याची प्रचीती घेणारे श्री. सत्यकाम कणगलेकर !

‘वर्ष २०१९ मध्ये माझ्या शारीरिक त्रासांचे प्रमाण वाढल्यामुळे मला सेवेसाठी प्रवास करणे अशक्य झाले. त्यामुळे मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून सेवा करू लागलो. तेव्हापासून मी ध्वनीचित्रीकरणाच्या संदर्भात सेवा करत आहे. या कालावधीत मला या सेवेचे स्वरूप आणि सहसाधकांची गुणवैशिष्ट्ये शिकायला मिळाली. ती पुढे दिली आहेत.

श्री. सत्यकाम कणगलेकर
श्री. केदार नाईक
श्री. विनयकुमार

१. चित्रीकरणाच्या सेवेचे स्वरूप आणि त्यातील अडचणी

१ अ. चित्रीकरणाची सेवा शारीरिक स्वरूपाची असणे आणि ही सेवा चालू असतांना सर्वांना सतत सतर्क स्थितीत उभे रहावे लागत असणे : चित्रीकरणाशी संबंधित सेवेचे स्वरूप व्यापक आहे. ही सेवा मोठ्या प्रमाणात शारीरिक स्वरूपाची आहे. ही सेवा करणारे साधकही अत्यल्प आहेत. येथे कोणतीही सेवा ‘बैठी’ नाही. चित्रीकरण चालू झाल्यावर काही ठराविक साधक वगळता सर्वांना सतत सतर्क स्थितीत उभे रहावे लागते. मुलाखत, संतांची भेट इत्यादींच्या चित्रीकरणांच्या वेळी १ – २ साधक बसू शकतात; मात्र इतर साधकांना उभेच रहावे लागते, तसेच चित्रीकरणाच्या स्वरूपावर ‘ते किती वेळ चालेल ?’, हे ठरते. काही वेळा आध्यात्मिक प्रयोग असल्यास चित्रीकरण सलग २० ते २५ घंटेही चालू रहाते.

१ आ. साधकसंख्या अल्प असतांना सेवा करणे : ३ घंट्यांच्या एखाद्या कार्यक्रमाचे चित्रीकरण करायचे झाल्यास एकूण १२ ते १८ तंत्रज्ञ साधकांची आवश्यकता असते. त्यांच्या जोडीला साहाय्यक साधकांचीही आवश्यकता असते. अन्य सेवा आणि साधक रुग्णाईत झाल्यास ते सेवेला पूर्णवेळ येऊ शकत नाहीत. अशा वेळी केवळ ४ ते ६ साधकांमध्ये चित्रीकरण करावे लागते. त्या वेळी चित्रीकरणाची सिद्धता आणि नियोजन करण्यापासून चित्रीकरण संपवून साहित्य आवरणे, अशा सर्वच स्तरांवरील सेवा या ४ – ५ जणांना कराव्या लागतात. असे असतांना पुष्कळ वेळा एकाच वेळी २ ठिकाणी चित्रीकरण करावे लागते. त्यामुळे ही संख्या आणखी विभागली जाते. चित्रीकरणाच्या सिद्धतेच्या समवेत अन्य जोडण्या करण्याची सेवाही याच साधकांना करावी लागते, उदा. आश्रमातील साधकांना कार्यक्रम पहाता येण्यासाठी ‘प्रोजेक्टर’ची जोडणी करणे इत्यादी.

१ इ. सेवा करत असतांना येणार्‍या अडचणी : अशा वेळी ‘ही सेवा करणार्‍या साधकांना पुरेशी विश्रांती न मिळणे, वेळच्या वेळी अल्पाहार किंवा भोजन न मिळणे किंवा मिळाल्यास तो शांतपणे बसून ग्रहण करता न येणे’, अशा विविध प्रकारच्या परिस्थितींना सामोरे जावे लागते, तरीही प्रत्येक साधक केवळ गुरुकृपेच्या बळावर दिवस-रात्र झटत असल्याचे लक्षात येते.

२. चित्रीकरणाची सेवा करतांना सहसाधकांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

श्री गुरुकृपेने मला सहसाधकांच्या समवेत चित्रीकरणाच्या सेवेची संधी मिळाली आहे. त्यांच्या समवेत सेवा करतांना मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

२ अ. परिपूर्ण आणि गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा करणारे श्री. विनयकुमार ! : श्री. विनय हे शांत आणि स्थिर असतात, तसेच ते मनापासून सेवा करतात. ‘घाईघाईने काहीतरी केले’, असे त्यांच्याकडून कधी होत नाही. सेवा मनापासून करत असल्यामुळे त्यांची सेवा परिपूर्ण आणि गुरुदेवांना अपेक्षित अशी होते.

२ आ. अभ्यासू वृत्तीचे श्री. केदार नाईक ! : श्री. केदार यांच्यामध्ये नियोजनकुशलता आणि अभ्यासू वृत्ती आहे. त्यांना विषयाचे आकलनही चांगले आणि लवकर होते. अभ्यासू वृत्ती असल्यामुळे ते नवीन सूत्रे लवकर आत्मसात् करतात. त्यामुळे पुष्कळ वेळा चित्रीकरणाच्या वेळी किंवा इतर सेवांमध्येही त्यांचे साहाय्य होते.(क्रमशः)

– श्री. सत्यकाम कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१०.२०२१)


या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/729780.html