‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्वनीचित्रीकरणाच्या सेवेशी संबंधित साधक, म्हणजे गुणांची खाणच आहे’, याची प्रचीती घेणारे श्री. सत्यकाम कणगलेकर !

‘वर्ष २०१९ मध्ये माझ्या शारीरिक त्रासांचे प्रमाण वाढल्यामुळे मला सेवेसाठी प्रवास करणे अशक्य झाले. त्यामुळे मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून सेवा करू लागलो. तेव्हापासून मी ध्वनीचित्रीकरणाच्या संदर्भात सेवा करत आहे. या कालावधीत मला या सेवेचे स्वरूप आणि सहसाधकांची गुणवैशिष्ट्ये शिकायला मिळाली. ती पुढे दिली आहेत. १८.१०.२०२३ या दिवशी आपण काही गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज पुढील भाग पाहूया

श्री. सत्यकाम कणगलेकर

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/729780.html


२. चित्रीकरणाची सेवा करतांना सहसाधकांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

२ उ. अवघड विषयांचे छायाचित्रण पुढाकार घेऊन आत्मविश्वासाने करणारे श्री. अतुल बधाले !

श्री. अतुल बधाले

श्री. अतुल हे आम्हा सर्व साधकांमध्ये वयाने सर्वांत लहान आहेत. त्यांच्यामध्ये ईश्वराप्रती भाव आहे, तसेच सातत्य आणि चिकाटी हे गुणही आहेत. आरंभी सेवा करतांना त्यांना अडचणी यायच्या. ते सेवा करतांना अनेकदा ‘चुका होतील’, या भीतीपोटी सेवेत पुढाकार घेत नसत; मात्र त्यांनी सेवा सोडून न देता ती सातत्याने आणि चिकाटीने शिकून घेतली. त्यामुळे आरंभी अल्प असलेला त्यांचा आत्मविश्वास आता वृद्धींगत झाला आहे. आता ते अवघड विषयांचे छायाचित्रण पुढाकार घेऊन आत्मविश्वासाने करतात.

२ ऊ. परिस्थिती स्वीकारून तत्परतेने सेवा पूर्ण करणारे श्री. स्नेहल राऊत ! (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)

श्री. स्नेहल राऊत

श्री. स्नेहल यांच्यामध्ये परिस्थिती स्वीकारणे आणि तत्परता हे गुण असल्याचे लक्षात आले. त्यांना पुष्कळ वेळा साहित्य आणण्यासाठी आणि ‘पार्सल’ पाठवण्यासाठी बाहेर जावे लागते. अशा वेळी श्री. स्नेहल तत्पर असतात. ती सेवा ते लगेचच पूर्ण करतात. त्यामुळे ‘काही कारणामुळे सेवा थांबून राहिली आहे’, असे होत नाही. एकदा प्रवासासाठी जातांना त्यांच्या जोडीला दुसरा चालक साधक उपलब्ध नव्हता. अशा वेळी त्यांनी गुरुकृपेच्या बळावर वाहन जवळजवळ ८०० कि.मी. एकट्याने चालवले. त्यांनी परिस्थिती स्वीकारून सेवा केली.

२ ए. सतत सेवारत असणारे श्री. विनीत देसाई !

श्री. विनीत देसाई

श्री. विनीत यांच्यात चांगली निरीक्षणक्षमता आहे. ‘एखाद्या प्रसंगात काय उणीव आहे ?’, याचे त्यांना लगेच आकलन होते. त्यांच्यात गुरु आणि ईश्वर यांच्याप्रती भाव आहे. ते सतत सेवारत राहून हा भाव व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना कोणतीही सेवा सांगितल्यास ते ‘जमणार नाही’, असे म्हणत नाहीत. त्यामुळे साधकही त्यांना हक्काने सेवा सांगतात.

२ ऐ. परिपूर्ण सेवा करणारे श्री. राजू सुतार !

श्री. राजू सुतार

श्री. राजू यांच्यात प्रेमभाव पुष्कळ आहे. साधकांकडून राहिलेली सूत्रे आणि होणार्‍या चुका ते त्या त्या साधकाला अतिशय प्रेमाने सांगतात. त्यांचा आवाज काही कारणामुळे वाढला आहे, असे माझ्या पहाण्यात नाही. श्री. राजू यांच्यात ‘परिपूर्णता’ हा गुणही आहे. त्यामुळे त्यांना एखाद्या सेवेचे दायित्त्व दिल्यास तेथे पुन्हा लक्ष द्यावे लागत नाही.

२ ओ. कलात्मकदृष्ट्या चित्रीकरण करणारे श्री. चेतन एम.एन्. !

श्री. चेतन एम.एन्.

श्री. चेतन यांना देवाने कलेची दृष्टी दिली आहे. त्यामुळे ‘योग्य ‘फ्रेम’ घेणे, कलात्मकदृष्ट्या चित्रीकरण करणे’, हे त्यांना चांगल्या प्रकारे जमते. ते स्थिर असतात, तसेच ‘प्रसंगाला अनुरूप चित्रीकरण कसे मिळवायचे ?’, यासाठी ते तळमळीने प्रयत्न करतात. श्री. चेतन यांच्या घरची स्थिती कठीण असूनही ते नेहमी सेवेचा विचार करतात. त्यांच्यामध्ये सेवा परिपूर्ण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे हातात घेतलेली सेवा पूर्ण झाल्याविना त्यांना चैन पडत नाही.

२ औ. भोळा भाव असणारे श्री. वाल्मीक भुकन !

श्री. वाल्मिक भुकन
श्री. वाल्मीक भुकन

श्री. वाल्मीक यांच्यात मुळातच भोळा भाव जाणवतो. त्यांना तांत्रिक माहिती तितकीशी नाही, तरीही ते केवळ भावाच्या जोरावर चित्रीकरणासंबंधी क्लिष्ट सेवा शिकत आहेत. त्यांनी छायाचित्रणासंबंधी सेवा शिकून आत्मसात् केल्या आहेत.

(क्रमश:)

– श्री. सत्यकाम कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१०.२०२१)