गाझा पट्टीवरील आक्रमण थांबवण्याची मागणी करणारा रशियाचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांनी फेटाळला !

वॉशिंग्टन (अमेरिका) – संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने रशियाचा गाझा पट्टीतील युद्ध थांबवण्याच्या संबंधीचा प्रस्ताव फेटाळला. या प्रस्तावामध्ये गाझा पट्टीतील सामान्य लोकांच्या विरोधात होत असलेला हिंसाचार थांबवण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रस्तावामध्ये हमासने इस्रायलच्या नागरिकांवर केलेल्या अत्याचारांचा उल्लेख नसल्याने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. १५ सदस्यांच्या या सुरक्षा परिषदेमध्ये प्रस्ताव संमत होण्यासाठी ९ मतांची आवश्यकता असते. या प्रस्तावाच्या समर्थनार्थ केवळ ४ मतेच मिळाली, तर ४ मते विरोधात पडली. अन्य देश तटस्थ राहिले. चीन, संयुक्त अरब अमिरात, मोझाम्बिक आणि गैबोन या देशांनी समर्थनार्थ, तर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जपान यांनी विरोधात मतदान केले.