Joe Biden visit to Israel : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन करणार इस्रायलचा दौरा !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

तेल अविव (इस्रायल) – इस्रायल-हमास यांच्या युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर १८ ऑक्टोबर या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे इस्रायलच्या दौर्‍यावर येणार आहेत; मात्र त्यांत्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. येथे १६ ऑक्टोबर या दिवशी इस्रायली संसदेच्या सत्राच्या पहिल्या दिवसाचे कामकाज चालू होते. त्या वेळी हमासने तेल अविववर रॉकेट्सचा मारा चालू केला. त्यामुळे अचानक ‘अलर्ट सायरन’ (सतर्क करणारे भोंगे) वाजू लागले आणि संसदेला तिचे कामकाज स्थगित करावे लागले. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासह सर्व खासदार यांना बंकरसारख्या खोल्यांमध्ये जावे लागले. त्यानंतर काही वेळाने पुन्हा संसदेचे कामकाज चालू झाले.  बायडेन यांच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर नेतान्याहू यांच्यासमोर केवळ राजनैतिकच नाही, तर संरक्षणात्मक दृष्ट्याही संकट उभे ठाकले आहे. ‘बायडेन यांनाही कोणत्यातरी बंकरमध्ये जावे लागेल कि काय ?’, अशी चर्चा चालू आहे.

दुसरीकडे अमेरिकेत ‘बायडेन यांनी इस्रायलचा दौरा करावा का ?’, यावर वरिष्ठ गुप्तचर अधिकारी आणि सल्लागार यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर बायडेन दौरा करणार असल्याचे निश्‍चित झाले. बायडेन तेल अविवला भेट दिल्यानंतर जॉर्डनलाही जाणार आहेत. तेथे ते जॉर्डन, इजिप्त आणि पॅलेस्टाईन या देशांच्याही वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेणार आहेत.