नवरात्रीच्‍या निमित्ताने कोल्‍हापूर महापालिकेच्‍या परिवहनची ‘श्री दुर्गादर्शन’ विशेष बससेवा !

‘श्री दुर्गादर्शन’साठी उपलब्धन करून देण्याचत आलेली विशेष बस

कोल्‍हापूर – नवरात्रीच्‍या निमित्ताने कोल्‍हापूर महापालिकेच्‍या परिवहनची ‘श्री दुर्गादर्शन’ विशेष बस सेवा १५ ते २३ ऑक्‍टोबर या कालावधीत भाविकांसाठी चालू करण्‍यात येणार आहे. यासाठी वातानुकूलित बसगाड्या देण्‍यात येणार आहेत. या सेवेसाठी प्रौढ व्‍यक्‍तींना १८५ रुपये, तर ३ ते १२ वर्षे वयोगटातील बालकांना ९५ रुपये दर आकारण्‍यात येणार आहे. या सेवेसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत आगाऊ पास वितरण करण्‍यात येणार आहेत. बस संख्‍येअभावी चालू वर्षी गटांना एकत्रित सेवा देण्‍यात येणार नाही.

या सर्व गाड्या शाहू मैदान येथून सुटतील. १५ ऑक्‍टोबरला दुपारी १ वाजता या सेवेचा आरंभ केला जाईल. प्रवासाचा कालावधीत साडेचार घंटे असून यात श्री लक्ष्मीदेवी, श्री एकवीरादेवी, श्री त्र्यंबोलीदेवी, श्री उजळंबादेवी, श्री पद्मावतीदेवी अशा १५ देवींचे दर्शन होईल. प्रत्‍येक मंदिरात १० मिनिटे दर्शन घेता येईल. अधिक माहितीसाठी श्री शाहू मैदान वाहतूक नियंत्रण केंद्र येथे दुर्गादर्शन सेवेचे प्रमुख श्री. सुनील जाधव – ९४२३२८०७१९ यांच्‍याशी संपर्क साधावा. तरी कोल्‍हापूर शहर आणि परिसरातील भाविक, प्रवासी, नागरिक यांनी या बससेवेचा लाभ घेऊन परिवहन उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन उपक्रमाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.