मुंबई, १० ऑक्टोबर (वार्ता.) – महाराष्ट्र शासनाने ‘मिशन शक्ती’च्या अंतर्गत राज्यात ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना २.०’ लागू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत दारिद्य्र रेषेखालील आणि दारिद्य्र रेषेवरील महिलांना बाळंतपणासाठी सरकारकडून ६ सहस्र रुपये इतके आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. यापूर्वी या योजनेच्या अंतर्गत पहिल्या बाळंतपणाच्या वेळी सरकारकडून ५ सहस्र रुपये दिले जात होते. सुधारित योजनेच्या अंतर्गत दुसर्या बाळंतपणासाठीही शासनाकडून आर्थिक साहाय्य केले जाणार आहे.
यापूर्वीच्या योजनेच्या अंतर्गत पहिल्या बाळंतपणासाठी देण्यात येणारे ५ सहस्र रुपये ३ टप्प्यांत दिले जात होते. सुधारित योजनेनुसार ही रक्कम २ टप्प्यांत दिली जाणार आहे, तसेच दुसर्या बाळंतपणासाठी दिले जाणारे अर्थसाहाय्य एकरकमी दिले जाणार आहे. यासाठी केंद्रशासनाकडून ६० टक्के, तर ४० टक्के रक्कम राज्यशासनाकडून दिली जाते. गरिबीमुळे गरोदरपणात महिलांना मजुरीसाठी जावे लागते. त्यामुळे माता आणि अर्भक यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे माता आणि बालक यांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ होते. हे रोखण्यासाठी शासनाकडून वर्ष २०१७ पासून ‘मातृवंदना’ योजना लागू करण्यात आली आहे.