गांधी हत्येनंतर असंख्य ब्राह्मणांची हत्या : साम्यवादी इतिहासकारांनी लपवलेले एक काळे सत्य !

गांधी हत्येनंतर काँग्रेसने ब्राह्मणांचे केलेले हत्याकांड म्हणजेच ‘ब्राह्मण फाइल्स’ !

ज्याप्रमाणे ‘काश्मीर फाइल्स’मध्ये काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराविषयी माहिती देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे ‘ब्राह्मण फाइल्स’मध्ये ब्राह्मणांच्या हत्यांविषयी माहिती देण्यात आली आहे. वर्ष १९४८ मध्ये ब्राह्मणांचा नरसंहार केला गेला. गांधींच्या हत्येनंतर ब्राह्मणांना वेचून वेचून मारण्यात आले आणि हे नीच कृत्य स्वतःला गांधीवादी म्हणवणार्‍या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केले होते, ज्याप्रमाणे वर्ष १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर शिखांच्या हत्या केल्या होत्या. सध्या वर्ष १९८४ मधील शिखांच्या हत्यांविषयी चर्चा केली जाते; परंतु वर्ष १९४८ मध्ये झालेल्या ब्राह्मणांच्या हत्यांविषयी कोणतीही चर्चा होत नाही. याविषयीचे पुरावे या लेखाद्वारे देत आहे.

गांधी हत्येनंतर झालेल्या दंगलीच्या वेळी एका इमारतीची आग लावून केलेली हानी

१. गांधी हत्येनंतर ब्राह्मणांच्या हत्याकांडाला प्रारंभ आणि त्याकडे वृत्तपत्रांनी केलेले दुर्लक्ष

३० जानेवारी १९४८ च्या संध्याकाळी नथुराम गोडसे यांनी गांधींची हत्या केली; परंतु त्यानंतर काय झाले ? हे कुणालाही ठाऊक नाही. ३० जानेवारी १९४८ च्या रात्रीपर्यंत संपूर्ण भारतात ही बातमी पसरली होती की, गांधी यांची हत्या करणार्‍याचे नाव नथुराम विनायक गोडसे आहे आणि ते चित्पावन ब्राह्मण आहेत. ही माहिती गांधीची हत्या झाल्यानंतर केवळ ४ ते ५ घंट्यात महाराष्ट्रात पोचवली गेली. त्या काळात सामाजिक माध्यमे तर सोडा; परंतु दूरभाषही नीट चालत नव्हते. ही माहिती पोचवण्यामागे तत्कालीन काँग्रेसच्या नेहरू सरकारचा हात होता. त्यानंतर स्वतःला गांधीवादी म्हणवणार्‍या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ब्राह्मणांची हत्या करण्यास प्रारंभ केला. सर्वांत आधी मुंबईत ही दंगल चालू झाली आणि त्याच रात्री २० ब्राह्मणांची हत्या करण्यात आली. पुण्यामध्ये ५० ब्राह्मणांची हत्या करण्यात आली. अमेरिकेतील वर्तमानपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’ आणि ‘न्यूयॉर्क टाइम्स’ यांच्याखेरीज काही वर्तमानपत्रांनी या बातमीला आपल्या वर्तमानपत्रात मुख्य बातमी बनवली.

श्री. प्रखर श्रीवास्तव

२. ब्राह्मणांच्या विरुद्ध हिंसेच्या घटनांमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते अधिक !

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री द्वारकाप्रसाद मिश्रा हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. इंदिरा गांधी यांना पंतप्रधान बनवण्यामध्ये द्वारकानाथ मिश्रा यांचे मोठे योगदान आहे. वर्ष १९४८ मध्ये द्वारकानाथ मिश्रा मध्य प्रांतचे (‘सेंट्रल प्रोव्हिन्स’चे) गृहमंत्री होते. यामध्ये आजच्या मध्यप्रदेशसह महाराष्ट्रातील विदर्भाचा काही भाग होता. द्वारकानाथ मिश्रा यांनी लिहिलेल्या ‘लिव्हींग ॲन इरा’ या पुस्तकाच्या दुसर्‍या भागात पान क्रमांक ५८ वर ब्राह्मण हत्याकांडाविषयी सविस्तर लिहिले आहे. त्यांनी लिहिले आहे, ‘‘गांधीजींची हत्या झाल्यानंतर ब्राह्मणांची घरे आणि दुकाने यांच्यावर आक्रमण करण्यासह त्यांना आगीत ढकलण्याचेही अपप्रकार करण्यात आले. ब्राह्मणांकडून चालवल्या जाणार्‍या शिक्षण संस्थाही यातून सुटल्या नाहीत. नागपूरमधील जोशी हायस्कूलला आग लावण्यात आली आणि ती विझवण्यासाठी आलेल्या अग्नीशमन दलाच्या कर्मचार्‍यांना जमलेल्या गर्दीतील लोकांनी परतवून लावले. ब्राह्मणांच्या विरुद्ध हिंसेच्या घटनांमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते अधिक संख्येने होते. त्यांपैकी काही जण काँग्रेस समितीचे पदाधिकारीही होते.’’

३. काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात घातलेला हैदोस आणि डॉ. नारायणराव सावरकर यांचा मृत्यू

डॉ. नारायणराव सावरकर

महाराष्ट्रातील कतहरे गावात एका पूर्ण ब्राह्मण कुटुंबाला ज्यांचे आडनाव गोडसे होते म्हणून जाळण्यात आले. या कुटुंबाचा नथुराम गोडसे यांच्याशी काहीही संबंध नव्हता. काँग्रेसच्याकार्यकर्त्यांचे चित्पावन ब्राह्मण हे लक्ष्य होते; परंतु पहाता पहाता अहिंसेचे पुजारी असलेल्या या काँग्रेसच्या  कार्यकर्त्यांनी सर्वच ब्राह्मणांना लक्ष्य करण्यास प्रारंभ केला. ज्यांच्या नावाच्या पुढे आपटे, गोखले, जोशी, कुलकर्णी, रानडे, देशपांडे अशी आडनावे होती, त्यांच्या मागे काँग्रेसचे कार्यकर्ते लागले. जबलपूरमध्ये (मध्यप्रदेश) प्रसिद्ध होणारे ‘उषःकाल’ या वर्तमानपत्रातील वृत्तानुसार महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये रहाणार्‍या सहस्रो ब्राह्मणांवर आक्रमणे करण्यात आली आणि जवळजवळ १ सहस्र ५०० ब्राह्मणांची घरे जाळण्यात आली. वाई तालुक्यातील (जिल्हा सातारा) उडतरे या गावात एका ब्राह्मण परिवारातील महिला आणि तिचा नातू यांना जिवंत जाळण्यात आले. पाचगणी येथे एका शाळेचा संचालक ब्राह्मण आहे; म्हणून त्या शाळेला आग लावण्यात आली. सांगली येथे एक कापडाची गिरणी आणि ‘टी.बी.’, म्हणजेच क्षयरोगावर उपचार करण्यात येणार्‍या एका रुग्णालयाला आग लावण्यात आली. कोल्हापूरमध्ये रा.स्व. संघाचे कार्यकर्ते जी.एच्. जोशी यांच्या कारखान्याला आग लावण्यात आली. त्याच शहरातील ख्यातनाम छायाचित्रकार भालजी पेंढारकर यांचा अडीच लाख रुपये किमतीचा स्टुडिओ आगीत बेचिराख करण्यात आला.

या दंगलीचा परिणाम स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे बंधू डॉ. नारायण सावरकर यांना भोगावा लागला. गांधी हत्येनंतर जमावाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुंबईतील घरावर आक्रमण केले; परंतु त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने त्यांनी जवळच शिवाजी पार्क येथे रहाणारे डॉ. नारायणराव सावरकर यांच्या घरावर आक्रमण केले. जमावाने डॉ. नारायण सावरकर यांना घराबाहेर काढून त्यांच्यावर दगडफेक करून त्यांना पुष्कळ प्रमाणात घायाळ केले. त्यानंतर काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला. स्वतंत्र भारतातील हे पहिले ‘मॉब लिंचिंग’ (समूहाने केलेली हत्या) म्हणता येईल. लोक म्हणतील की, ‘गांधी हत्येमागे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा हात होता’; परंतु त्यांचे लहान बंधू डॉ. नारायणराव सावरकर यांचा काय दोष होता की, ज्यांना दगड मारून मृत्यूची शिक्षा देण्यात आली.

४. ब्राह्मणांची कोट्यवधी रुपयांची हानी आणि ब्राह्मण महिलांशी काँग्रेस कार्यकर्त्यांचे गैरवर्तन

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहस्रो ब्राह्मणांची हत्या करण्यात आली; परंतु नेहरू सरकारने हे सत्य कुणासमोरही आणले नाही. त्यांच्या नंतरच्या सरकारांनीही हे सत्य पुढे आणण्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत. याचा पुरावा म्हणजे प्रसिद्ध अमेरिकी लेखक मॉरिस पॅटरसन हिच्या संशोधन प्रकल्पातून मिळतो. या संशोधन प्रबंधाचे नाव आहे, ‘शिफ्टिंग फॉर्च्युन्स ऑफ चित्पावन ब्राह्मण फोक्सड् ऑन नाईन्टीन फोर्टीएट.’’ तिने जे लिहिले आहे, ते ‘गांधी आणि गोडसे’, या पुस्तकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पुस्तकात लिहीले आहे की, मॉरिस पॅटरसन ही गांधी हत्येनंतर २ दशकांनी चित्पावन ब्राह्मणांवर संशोधन करत होती. त्या वेळी तिला वर्ष १९४८ मधील ब्राह्मणविरोधी दंगलींच्या कागदपत्रांपर्यंत पोचू दिले नाही. मॉरिस यांना दिसून आले की, गांधी हत्येनंतर हिंदु राष्ट्रवाद्यांची सर्वाधिक प्रमाणात हत्या सातारा, बेळगाव अन् कोल्हापूर या ठिकाणी झाल्या. एका अनुमानानुसार त्या काळात ब्राह्मणांची जवळजवळ ५० कोटी रुपयांची संपत्ती नष्ट झाली. मॉरिस पॅटरसन हिने केलेल्या संशोधनात म्हटले आहे की, या दंगलींच्या नंतर चित्पावन ब्राह्मण सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने कमकुवत झाले. या दंगलींमध्ये केवळ पुरुष नव्हे, तर ब्राह्मण महिलांशीही गैरवर्तन केले गेले.

४ अ. ब्राह्मण समाज आणि त्यांच्या महिलांशी झालेल्या गैरवर्तनाविषयी ‘भारतरत्न’ पी.व्ही. काणे यांनी उघड केलेले वास्तव : मुंबई विद्यापिठाचे उपकुलगुरु, राज्यसभा सदस्य आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित पी.व्ही. काणे यांनी सरकारमधील काही नेत्यांना लिहिलेल्या पत्रांतून याविषयीचा पुरावा मिळतो. ८ फेब्रुवारी १९४८ या दिवशी लिहिलेल्या पत्रामध्ये काणे यांनी म्हटले आहे, ‘गांधी हत्येनंतर गुंडांनी ब्राह्मणांच्या घरांवर आक्रमणे केली आणि आगी लावल्या. त्यांच्या महिलांशी गैरवर्तन केले. असे हिंदु-मुसलमान दंगलीच्या वेळीही घडले नव्हते.’’

५. तत्कालीन मंत्री एन्.व्ही. गाडगीळ आणि द्वारकानाथ मिश्रा यांनी उघड केलेली भयावहता

यावरही आपला विश्वास नसेल, तर नेहरूंच्या मंत्रीमंडळातील सार्वजनिक खात्याचे मंत्री एन्.व्ही. गाडगीळ यांचे ‘गव्हर्न्मेंट फ्रॉम इनसाईड’ हे पुस्तक सर्वांनी वाचले पाहिजे. त्यांच्या पुस्तकातील १४८ व्या पानावर म्हटले आहे, ‘‘गांधीजींच्या हत्येनंतर काही घंट्यांतच मला बातमी मिळाली की, मुंबईमध्ये ब्राह्मणांना त्यांच्या घरातून बाहेर काढून मारहाण केली जात आहे. याविषयीची सूचना मी तात्काळ गृहमंत्री पटेल यांना दिली. देहलीमध्ये रहाणारे महाराष्ट्रीयनही या वेळी घाबरलेले होते. त्या वेळी उत्तर भारतात कुणीही महिला जर महाराष्ट्रीयन पद्धतीची साडी नेसून गेली, तर तिला ‘गोडसे यांच्या समाजातील’, असे म्हणून हिणवत होते.’’

५ अ. काँग्रेस कार्यकर्त्यांचा तत्कालीन ब्राह्मण मंत्र्यांविषयी द्वेष

५ अ १. गांधीजींच्या हत्येनंतर १२ दिवसांनी सरदार पटेल यांनी मला (एन्.व्ही. गाडगीळ यांना) म्हटले, ‘‘गांधीजींच्या स्मृतीप्रीत्यर्थ देहलीमध्ये यमुना नदीच्या किनार्‍यावर होणार्‍या समारंभाचे अध्यक्षपद तुम्हाला भूषवायचे आहे; परंतु कित्येक काँग्रेस कार्यकर्ते याचा विरोध करत आहेत.’’ तेव्हा मी सांगितले, ‘‘काही काँग्रेस कार्यकर्ते महाराष्ट्रीयन ब्राह्मणाला अध्यक्षपद देण्याच्या विरोधात असतील, तर मला तिथे नियुक्त करू नये.’’ गाडगीळ यांचे हे वक्तव्य वाचून काँग्रेसमध्ये महाराष्ट्रीयन ब्राह्मणांच्या विरोधात किती द्वेष होता ? याची कल्पना येते.

५ अ २. मध्य प्रांतचे गृहमंत्री द्वारकानाथ मिश्रा यांनी जेव्हा ब्राह्मणांच्या हत्या रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यांनी ‘लिव्हींग ॲन एरा’ या पुस्तकातील पान क्रमांक ५८ वर म्हटले आहे, ‘‘हिसेंच्या आरोपाखाली पोलिसांनी १०० हून अधिक काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक केली होती; परंतु त्यांना सोडण्यासाठी माझ्यावर पुष्कळ प्रमाणात दबाव आणण्यात आला. नागपूरमध्ये काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या बैठकीत माझ्यावर टीका करण्यात आली. देहलीमध्ये सरदार पटेल यांच्याकडे माझ्याविरुद्ध तक्रार करणार’’, अशी धमकीही मला त्यांनी दिली. ‘‘काँग्रेस कार्यकर्त्यांना कायद्याने हिंसा करण्याची सूट दिली आहे, असा आदेश ते देहलीतून आणू शकतील का ?’’, असे मी त्या लोकांना विचारले.

६. साहित्यिक गजानन माडखोलकर यांच्या पुस्तकावर नथुराम गोडसे यांनी दिलेले उत्तर

या दंगलीमध्ये प्रसिद्ध साहित्यिक आणि दैनिक ‘तरुण भारत’चे तत्कालीन संपादक गजानन त्र्यंबक माडखोलकर यांच्या घरावर ३१ जानेवारी १९४८ या दिवशी आक्रमण झाले होते. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राबाहेर निर्वासिताप्रमाणे रहावे लागले. या प्रसंगावर त्यांनी नंतर ‘एका निर्वासिताची कहाणी’ लिहिली. या कहाणीमध्ये माडखोलकर यांनी ‘या दंगलीसाठी नथुराम गोडसे उत्तरदायी आहेत’, असे म्हटले होते.

अंबाला कारागृहात असलेल्या नथुराम गोडसे यांनीही ही कहाणी वाचली आणि त्यांना पुष्कळ दुःख झाले. आपल्या फाशीच्या एक दिवस आधी, म्हणजे १४ नोव्हेंबर १९४९ या दिवशी गोडसे यांनी माडखोलकर यांना एक पत्र िलहिले की, जे नंतर पुण्याहून प्रकाशित होणार्‍या ‘सोबत’ या साप्ताहिकामध्ये वर्ष १९७० मध्ये प्रसिद्ध झाले. या पत्रात गोडसे यांनी म्हटले, ‘‘आपल्याला या गोष्टीचे दुःख आहे की, गांधी यांची हत्या करणारा आपल्या समाजातील म्हणजे चित्पावन ब्राह्मणांपैकी एक आहे. यामुळे आपल्याला दुःख आणि लाज वाटली असेल. गांधींच्या हत्येनंतर ब्राह्मणांविरुद्ध ज्या घटना घडल्या त्या वाचून माझे विचारही काही आपल्यासारखेच होते; परंतु गांधीजींनी प्रारंभीपासून दयेच्या नावाखाली हिंदूंवर भयानक आघात केले होते. देहलीच्या थंडीमध्ये शरणार्थी हिंदू जेव्हा झाडाखाली राहू शकले नाहीत, तेव्हा ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मशिदींच्या आसर्‍याला गेले. तेव्हा गांधीजींनी आपले प्राणपणाला लावून त्यांना मशिदीमध्ये राहू दिले नाही. शरणार्थींना रहाण्यासाठी जागा न देता गांधीवादी सरकारने सहस्रो पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले यांना थंडीच्या दिवसात रस्त्याच्या कडेला अन् गटार येथे रहाण्यास विवश केले. माडखोलकर केवळ एक क्षण विचार करा की, सहस्रो विस्थापित पंजाबी महिलांपैकी एक आपलीही धर्मपत्नी असती, तर आपल्याला काय वाटले असते ? या कल्पनेला एक क्षणही आपल्या मनात ठेवू नका; परंतु मी आपल्याला एक प्रश्न करतो की, आपण अशा प्रकारच्या हत्या करणार्‍या मनुष्याविषयी कोणता विचार कराल ? ही कहाणी भावनात्मक कल्पना नसून एक सत्य घटना आहे.’’

७. काँग्रेसी कार्यकर्त्यांनी केलेल्या हत्यांचा हिशोब कोण देणार ?

गोडसे यांनी जे केले, त्यासाठी आजही हिंदु विचारधारेची अपकीर्ती केली जाते; परंतु गांधी यांच्या हत्येनंतर गांधीवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जे केले त्याचा हिशोब कोण देणार ? गांधीवाद, अहिंसा आणि शांती यांचे ढोंग करून दुसर्‍यांना लक्ष्य करण्याविषयीची वृत्ती आजही जिवंत आहे. यामध्ये गुजरातमध्ये मुसलमानविरोधी आणि वर्ष १९८४ मधील शीखविरोधी दंगली यांची चर्चा केली जाते; परंतु गांधी यांच्या हत्येचा सूड शेकडो ब्राह्मणांची हत्या करून घेतला गेला, याविषयी कुणीही बोलत नाही. नेहमी ब्राह्मणांना खलनायक बनवणार्‍या साम्यवादी इतिहासकारांना हे शोभत नाही. त्यांनी या घटनेविषयी सांगितले पाहिजे. गांधी हत्येनंतर ब्राह्मणांच्या हत्या झाल्याच्या या घटनेला मोठ्या चलाखीने लपवले गेले आहे.

– श्री. प्रखर श्रीवास्तव, लेखक आणि पत्रकार

(साभार : ‘कॅपिटल टीव्ही’ यू ट्यूब वाहिनी)

संपादकीय भूमिका

काँग्रेसवाल्यानी आतापर्यंत केलेल्या विविध हत्याकांडाविषयी ते देशभरातील जनतेची क्षमा मागण्याचे धाडस दाखवतील का ?