आसामच्या ५ आदिवासी मुसलमान समाजाचे सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण होणार !

गौहत्ती (आसाम) – बिहारमध्ये जातीगत जनगणना करण्यात आल्यानंतर आता आसाममध्ये ५ मूळ आदिवासी मुसलमान समाजाच्या (गोरिया, मोरिया, देशी, सैयद आणि जोल्हा) सामाजिक आणि आर्थिक स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. यामुळे या समाजाच्या विकासासाठी पावले उचलता येतील, असे आसाम सरकारकडून अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे.

वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार आसाममध्ये मुसलमानांची लोकसंख्या १ कोटी ६ लाख इतकी होती. ही लोकसंख्येच्या ३४.२२ टक्के होती. सध्या यात वाढ होऊन ती ४० टक्क्यांपेक्षाही अधिक होण्याचा अंदाज आहे. सध्या आसामची लोकसंख्या सुमारे साडेतीन कोटी आहे. यात १ कोटी ४० लाख मुसलमान आहेत. आसाममध्ये इस्लाम दुसरा सर्वांत मोठा धर्म आणि सर्वांत वेगाने वाढणारा धर्म आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांत ५२ टक्के ते ९९ टक्क्यांपर्यंत मुसलमान आहेत. ८ इतर जिल्ह्यांत मुसलमानांची संख्या वेगाने वाढली आहे. हे लक्षात घेऊन सरकार या जिल्ह्यांत मुसलमानांचा अल्पसंख्यांक दर्जा काढून घेण्याचा विचार करत आहे.