गेल्या ५ वर्षांत किशोरवयीन मुलींना गर्भधारणा होण्याची एकूण ८६ प्रकरणे नोंद
पणजी, २५ सप्टेंबर (वार्ता.) – गत ५ वर्षांमध्ये गोव्यात किशोरवयीन मुली गर्भवती होण्याची एकूण ८६ प्रकरणे नोंद झालेली आहेत. यामुळे किशोरवयीन मुलींच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सरकारकडूनही गर्भधारणेसंबंधी वाढत्या घटनांविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
सरकारच्या महिला आणि बाल विकास खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार परराज्यांतून गोव्यात आलेल्या कुटुंबातील किती किशोरवयीन मुलींचा यात सहभाग आहे?, याची माहिती सरकारकडे उपलब्ध नाही. किशोरवयीन मुलींमध्ये गर्भधारणा होण्याच्या वाढत्या प्रकारणांविषयी सरकारने अन्वेषण चालू केले आहे. या अन्वेषणातून विविध पैलूंचा उलगडा होणार आहे. सरकारने अशा मुलींच्या साहाय्यासाठी विशेष पीडित साहाय्य केंद्र चालू केले आहे. यामध्ये अशा स्थितीतील मुलींना सर्वतोपरी साहाय्य आणि आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. म्हापसा बसस्थानक आणि मडगाव रेल्वेस्थानक या अधिक वर्दळ असलेल्या ठिकाणी मुलांसाठीची ‘हेल्पलाईन’ सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गोवा राज्य बाल हक्क आयोग राज्यभरातील मुलांचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी सक्रीय आहे. किशोरवयीन मुली गर्भवती होण्याचे प्रमाण घटवण्यासाठी राज्यातील आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक माहिती देणे, शिक्षण देणे योग्य संवाद साधणे आदी प्रयत्न केले जात आहेत.
दक्षिण गोव्यात ८ मासांत १८ अल्पवयीन मुलींचे अपहरण
मडगाव, २५ सप्टेंबर (वार्ता.) – दक्षिण गोव्यात चालू वर्षी जानेवारी ते ऑगस्ट या ८ मासांच्या कालावधीत अल्पवयीन मुलींचे अपहरण होण्याची एकूण १८ प्रकरणे नोंद झालेली आहेत. यातील १५ प्रकरणांचा छडा लावण्यास पोलिसांना यश आले आहे. यामधील बहुतांश प्रकरणे ही प्रेमप्रकरणांशी निगडित असल्याचे पोलिसांना अन्वेषणातून आढळले आहे.
गोव्यात बाल कायदा अस्तित्वात आहे आणि या कायद्याच्या अंतर्गत अल्पवयीन मुली गायब होण्याची प्रकरणे ‘अपहरण’ म्हणून नोंद केली जातात. दक्षिण गोव्यात गेल्या ८ मासांत अल्पवयीन मुलींचे अपहरण होण्याच्या सर्वाधिक घटना फोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. फोंडा पोलीस ठाण्यात अशा प्रकारच्या ३ घटना घडल्या असून त्यांपैकी २ प्रकरणांचा छडा लागला आहे.
संपादकीय भूमिका
|