१. चिनी अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे २३ टक्के चिनी तरुण नोकर्यांपासून वंचित
‘चीनची अर्थव्यवस्था मंदीच्या तडाख्यात आहे. त्याचा भारतावर चांगला परिणाम होऊ शकतो. चीनमधील मंदीमुळे भारतीय उद्योगांना विविध दारे खुली होत आहेत. चीनची अनेक मोठी आस्थापने दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत. चीनमध्ये बेकारी वाढत आहे. असे म्हटले जाते की, अनुमाने २३ टक्के तरुणांना नोकरी मिळत नाही. त्यामुळे अनेक युवक देशाबाहेर जात आहेत. चिनी अर्थव्यवस्थेच्या मंदीचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर निश्चितच होत आहे; मात्र ती भारतीय उद्योगांना नव्या संधींची दारे खुली करत आहे. चीनमधील बांधकाम आणि गृहनिर्माण क्षेत्राला मंदीचा मोठा फटका बसला आहे. ‘कंट्री गार्डन’ या आस्थापनेने पहिल्या सहामाहीत ७ अब्ज डॉलरचा (५८ सहस्र १०० कोटी रुपये) विक्रमी तोटा नोंदवला. कंपनीला १९४ अब्ज डॉलर (१ लाख ६१ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) देणे आहे. असून तिच्याकडे केवळ १३.९ अब्ज डॉलर (१ लाख ७ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) निधी उपलब्ध आहे. त्यामुळे ती दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. चीनमध्ये मालमत्ता गुंतवणुकीत ८.५ टक्के इतकी घट नोंदवली गेली आहे. तसेच विकासकांनी मालमत्तेचे बांधकाम आणि विक्री यांसाठी मोठ्या प्रमाणावर कर्जे घेतली होती, जी थकीत झाली आहेत.
२. चिनी अर्थव्यवस्थेवर ‘डिफ्लेशन’चा (चलनघट) धोका
जगातील दुसर्या क्रमांकांची अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये ‘डिफ्लेशन’ येत आहे. वस्तू आणि सेवा यांच्या किमतीत झपाट्याने होणार्या घसरणीला ‘डिफ्लेशन’ म्हणतात. ‘डिफ्लेशन’चे मुख्य कारण, म्हणजे बाजारात उत्पादनांचे प्रमाण वाढून खरेदीदारांची संख्या न्यून होणे आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ‘डिफ्लेशन’ चीनमध्ये प्रथमच होत आहे. वस्तू आणि सेवा यांंच्या किमती न्यून झाल्यानंतर ग्राहक स्वस्तात खरेदी करू शकतात; परंतु त्याचा व्यवसायावर फार वाईट परिणाम होतो आणि आस्थापनांच्या लाभाचे प्रमाण न्यून होते.
गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून चीनच्या निर्यातीत सातत्याने घट होत आहे. महागाई आणि वाढत्या व्याजदराचा जागतिक मागणीवर लक्षणीय परिणाम झाला आहे. निर्यात न्यून झाल्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे चीनही जपानप्रमाणे दीर्घकाळ मंदीच्या गर्तेत अडकण्याची शक्यता निर्माण होत आहे.
३. बांधकाम आणि गृहनिर्माण क्षेत्र आर्थिक संकटात
चीनमधील बांधकाम आणि गृहनिर्माण क्षेत्र हे चिनी अर्थव्यवस्थेतील सर्वांत महत्त्वाचे क्षेत्र आहे. त्याची व्याप्ती ‘जीडीपी’च्या (सकल देशांतर्गत उत्पादनाच्या) अनुमाने १३ टक्के इतकी आहे. चीनमधील बांधकाम क्षेत्र ‘जीडीपी’च्या १३ टक्के असल्याने चिनी अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसला आहे. त्याच वेळी उत्पादन क्षेत्रही मागे पडत आहे. चीनमध्ये २०० दशलक्ष रोजगार हे एकटे क्षेत्र देते. मागणीच्या अभावी चीनमध्ये २०० दशलक्ष घरे रिकामी आहेत. त्यामुळे बांधकाम क्षेत्र मंदीच्या सावटाखाली आहे. विकासकांनी बँक किंवा अन्य आर्थिक संस्थांकडून घेतलेले कर्ज ‘ट्रिलियन डॉलर’च्या घरात आहे आणि हा बोजा विकासकांसाठी मारक ठरला आहे. विकासक कर्जाची परतफेड करू शकत नसल्याने चीनला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्याचा परिणाम चिनी अर्थव्यवस्थेवर होत आहे.
गृहनिर्माण क्षेत्राच्या बरोबरीने उत्पादन क्षेत्रही आव्हानांना तोंड देत आहे. रोजगाराचा वाढलेला खर्च, अन्य देशांशी असलेली वाढती स्पर्धा, अमेरिकेशी चालू असलेले व्यापार युद्ध यांमुळे उत्पादन क्षेत्राला फटका बसला आहे. आर्थिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणात दिलेले कर्ज, खासगी वित्त आस्थापनांशी असलेली स्पर्धा आणि पारदर्शकतेचा अभाव यांचा सामना चीनला करावा लागत आहे. चीनची आर्थिक वाढ मंदावली असल्याने ‘जीडीपी’चा दर ६ टक्क्यांच्या खाली आला आहे. अशी अर्थव्यवस्थेची पडझड चिनी अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारी आहे. जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये आलेली मंदी जागतिक आर्थिक वाढ मंदावणारी ठरणार आहे.
४. सरकारी कर्जे फेडण्याविषयी चीनची चिंता
चीनचे सरकारी कर्ज हीसुद्धा एक प्रमुख चिंता आहे. पायाभूत सुविधा प्रकल्प आणि इतर उपक्रम यांना वित्तपुरवठा करण्यासाठी चिनी सरकार मोठ्या प्रमाणावर कर्ज घेते. सरकारी कर्जे, म्हणजे विविध नगरपालिका, राज्ये, सरकारी विभाग यांनी काढलेली कर्जे होय. चीन सरकारचे कर्जही प्रचंड वाढलेले आहे. ही कर्जे कशी फेडायची ? याची चिंता चीनसमोर आहे.
५. चीनच्या आर्थिक मंदीमुळे भारताला होणारे लाभ
अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे चीनला विविध आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते; मात्र ही भारतासाठी एक पुष्कळ चांगली संधी आहे. चीनमधील अनेक कारखाने तेथून बाहेर पडत आहेत. त्यातील काही निश्चितपणे भारतात येत आहेत. अमेरिका किंवा युरोपमधील विदेशी गुंतवणूकदारांनी ‘चिनी स्टॉक मार्केट’मधून त्यांचे पैसे काढून घेतले आहेत आणि काही प्रमाणात ते भारतात येत आहेत. चिनी अर्थव्यवस्था मंदावल्यामुळे ज्या गोष्टी चीन आयात करायचा, त्यांच्या किमती न्यून होत आहेत. त्या वस्तू भारताला अल्प किमतीत मिळू शकतील. चीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा एक मोठा कारखानदार होता. आता व्यय परवडत नसल्यामुळे ते कारखानेही बाहेर पडत आहेत. ते भारताकडे येऊ शकतील. चीनमधील वाहन उद्योग एक मोठा उद्योग होता. तेथे पडझड चालू झाली आहे. औषधांच्या निर्यातीत चीनला मोठ्या अडचणी येत आहेत. या सर्व गोष्टी भारताला अनुकूल आहेत.
भारत सेमीकंडक्टर निर्मितीत ‘आत्मनिर्भर’ योजना राबवत आहे. ‘मेक इन इंडिया’च्या अंतर्गत लॅपटॉप आणि संगणक यांची निर्मिती करत आहे. जी उत्पादने भारत हा चीन आणि पाश्चात्त्य देश येथून आयात करायचा, त्यांचे उत्पादन भारतातच बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. यासमवेतच लघु आणि मध्यम उद्योग यांची वृद्धी करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. भारतात दळणवळण व्यवस्था चांगली झाली आहे. त्यामुळे चीनमधील मंदीचा भारत चांगल्या प्रकारे लाभ करून घेऊ शकतो. हे होत असतांना भारताच्या अर्थव्यवस्थेला हानी पोचवणारी राजकीय प्रेरित हिंसक आंदोलने आणि बंद यांना लगाम घालणेही आवश्यक आहे.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.