भारतात भूजलाच्या वाढत्या उपशामुळे भारताला गंभीर धोका ! –  अमेरिकी शास्त्रज्ञांचे संशोधन

नवी देहली – अमेरिकेतील मिशिगन विश्‍वविद्यालयातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार भारतात शेतकर्‍यांनी सध्याच्या वेगाने भूजलाचा उपसा करणे चालूच ठेवले, तर वर्ष २०८० पर्यंत देशातील भूजल साठा खालावण्याचा वेग सध्याच्या वेगापेक्षा तिपटीने वाढेल. त्यामुळे देशाची अन्नसुरक्षा, तसेच जलसुरक्षा यांना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

१. ‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ या विज्ञानपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या संशोधनात म्हटले आहे की, जागतिक तापमानवाढीमुळे भारतातील शेतकर्‍यांनी जलसिंचनासाठी भूजलाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. परिणामी जलसाठा घटल्याने देशाच्या १४० कोटी लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकसंख्येची उपजीविका धोक्यात येईल आणि त्याचे जागतिक पातळीवरही भीषण परिणाम होतील, अशी चेतावणीही यात देण्यात आली आहे.

२. मिशिगन विश्‍वविद्यालयाच्या साहाय्यक प्राध्यापक मेहा जैन यांनी म्हटले की, भारत हा भूजलाचा सर्वाधिक वापर करणारा देश आहे. प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर अन्नपुरवठा करण्यासाठी भारत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे भूजल उपशाविषयी मांडण्यात आलेले निष्कर्ष भारतासाठी गंभीर आहेत.

संपादकीय भूमिका

शीतपेय, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या यांच्यामुळेच अधिक उपसा होत असल्याने यावर प्रथम बंदी घालण्याची आवश्यकता आहे, असे कुणाला वाटले, तर ते चुकीचे ठरू नये !