राज्यात ‘उत्कृष्ट गणेशोत्सव’ स्पर्धा !
मुंबई – राज्यशासनाने १९ सप्टेंबर २०२३ पासून चालू होणार्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत अधिकाधिक मंडळांनी १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. गणेशोत्सव मंडळांनी [email protected] या इ-मेलवर अर्ज करावा. राज्यशासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या ४ जुलै २०२३ या दिवशीच्या शासन निर्णयात स्पर्धेचा तपशील, स्पर्धा निवडीचे निकष नमूद केले आहेत. तसेच अर्जही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
#मुंबई
राज्य शासनाने १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या #गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना #पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी १५ सप्टेंबरपर्यंत आपला सहभाग नोंदवावा : सांस्कृतिक कार्यमंत्री @SMungantiwar pic.twitter.com/CeJtLFkcK7— आकाशवाणी बातम्या नागपूर (@airnews_nagpur) August 30, 2023
या स्पर्धेसाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ आणि अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी एक याप्रमाणे उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येईल. या ४४ मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास ५ लाख रुपयांचे, द्वितीय क्रमांकास अडीच लाख रुपयांचे, तर तृतीय क्रमांकास एक लाख रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ सहस्र रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.