गणेशोत्सवाच्या कालावधीत पुणे येथून कोकणात जाण्यासाठी ३ विशेष रेल्वे गाड्या

पुणे – गणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबईनंतर आता पुणे विभागामधून कोकणसाठी विशेष गाड्या सुटणार आहेत. पुणे येथून ३ विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय पुणे रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. १५, २२ आणि २९ सप्टेंबर या दिवशी या विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत.

पुणे रेल्वेस्थानकावरून सुटणार्‍या या गाड्यांना पुणे, लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या रेल्वेस्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

पुणे-कुडाळ ही विशेष रेल्वेगाडी १५, २२ आणि २९ सप्टेंबर या दिवशी पुणे स्थानकामधून सुटणार आहे. ही गाडी सायंकाळी ६.१५ वाजता सुटणार आहे.

परतीच्या प्रवासासाठी कुडाळवरून पुणे अशी विशेष रेल्वे १७, २४ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर या दिवशी धावणार आहे. ही कुडाळ रेल्वेस्थानकातून दुपारी ४.०५ वाजता सुटणार आहे.

मुंबई येथून १ लाख गणेशभक्तांच्या तिकिटांची निश्चिती !

मुंबईवरून विशेष रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. मुंबईवरून जाणार्‍या रेल्वेसाठी आतापर्यंत १ लाख ४ सहस्र गणेशभक्तांची तिकिटांची निश्चिती (कन्फर्म) झाली आहे.  त्या माध्यमातून रेल्वेला ५ कोटी १३ लाख रुपये मिळाले आहेत.