भारताने २३ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘चंद्रयान-३’ यशस्वीपणे उतरवले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे यान उतरवणारा भारत जगातील पहिला देश ठरला. या मोहिमेमुळे चंद्रावर यान पाठवणार्या अमेरिका, चीन, रशिया या देशानंतर भारत चौथा देश ठरला आहे. ‘इस्रो’चे अध्यक्ष, शास्त्रज्ञ आणि कर्मचारी यांच्या अथक परिश्रमाचे हे यश आहे. या मोहिमेचे नेतृत्व करणार्या महिला शास्त्रज्ञांनी यानाच्या उड्डाणापूर्वी तिरुपतीच्या बालाजीला घातलेले साकडेही फलद्रूप ठरले आहे. ‘चंद्रयान-३’ मोहिमेला यश मिळण्यासाठी देशात कोट्यवधी हिंदूंकडून देवाकडे प्रार्थना, यज्ञ आणि महाआरत्याही करण्यात आल्या. याचीच परिणती म्हणून देवाने भक्तांच्या पदरात ‘चंद्रयान-३’ मोहिमेच्या यशस्वीतेचा कृपाप्रसाद टाकला. मोहिमेच्या यशामुळे सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते.
अंनिसवाल्यांच्या हिंदुद्वेषाला खडेबोल !
चंद्रयान मोहिमेविषयी सर्वत्र उत्साहाचे वातावरण असतांना यामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खोडा घातला. अंनिसने स्वतःच्या फेसबुक खात्यावरील लिखाणामध्ये ‘चंद्रयान मोहीम यशस्वी होण्यासाठी पूजा, मंत्र, तंत्र, होमहवन उपयोगी ठरणार नसून अचूक ‘तंत्रज्ञानच’ ही मोहीम यशस्वी करू शकेल’, अशी मुक्ताफळे उधळली. अंनिसने स्वतःचा हिंदुद्वेष कायम ठेवून चंद्रयान मोहिमेला शुभेच्छा देतांना हिंदु धर्माचा अवमान केला. यावर नेटकर्यांनी अंनिसला खडेबोल सुनावले आहेत. काही नेटकर्यांनी ‘चंंद्रयान मोहीम यशस्वी होण्यासाठी अंनिसच्या शुभेच्छांची ‘इस्रो’ला आवश्यकता नाही’, असे सुनावले आहे. काहींनी अंनिसला श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांतील भेद समजून घेण्याचा सल्ला दिला. ‘तंत्रज्ञानाची जोड आवश्यक असली, तरीही चंद्रयानासमवेत १४० कोटी जनता आपल्या देशाप्रती असलेल्या श्रद्धेमुळे पूजा करत आहे, यात कोणतीही अंधश्रद्धा नाही’, असेही काही नेटकर्यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे दक्षिण भारतातील अभिनेते रामचरण, सूर्या यांनी या मोहिमेचे कौतुक करून अभिनंदन करत असतांना अभिनेते प्रकाश राज यांनी एका ट्वीटमधून ‘इस्रो’च्या चंद्रयान मोहिमेची प्रथम खिल्ली उडवली. आता ‘इस्रो’ला यश मिळाल्यानंतर त्यांनी वाहवा केली आहे. खरेतर अशा कलाकारांच्या चित्रपटांवर बहिष्कारच घालणे योग्य होईल. अशा कलाकारांनी पाकिस्तानची अभिनेत्री सेहर शिनवारी हिच्याकडून बोध घ्यायला हवा. अभिनेत्री सेहर शिनवारी हिने या मोहिमेविषयी भारताचे कौतुक आणि अभिनंदन करून ‘पाकिस्तानने वैर विसरून यातून बोध घ्यावा’, असे खडेबोल सुनावले आहेत. खरेतर जगात तंत्रज्ञानदृष्ट्या बलवान असलेले इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जपान, कोरिया आदी देशांना जे साध्य करता आले नाही, ते सहज साध्य करून भारताने त्या देशांना तोंडात बोटे घालायलाही भाग पाडले आहे. आजतागायत ‘इस्रो’ने अनेक उड्डाणे साध्य करून विविध उपग्रहे, तसेच अंतराळयान मोहिमांचे शतक पार केले आहे. अवकाशयान उड्डाण तंत्रज्ञानात खास प्रावीण्य प्राप्त केलेल्या ‘इस्रो’ने २०९ परदेशी उपग्रहांचेही प्रक्षेपण केले आहे. यामध्ये ध्रुवीय अवकाशयान उड्डाण मोहिमेद्वारे एकाच वेळी १०४ उपग्रहांना यशस्वीरित्या अपेक्षित कक्षेत स्थापित केले आहे. ज्यामध्ये भारताचे केवळ ३, तर उरलेले अन्य देशांचे उपग्रह होते. ही भारताची विशेष कामगिरी ठरली आहे. ‘इस्रो’चे शास्त्रज्ञ या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यापूर्वी त्याच्या प्रतिकृती तिरुपति बालाजीच्या चरणी ठेवून आशीर्वाद घेत असल्यामुळे एकही उपग्रह कोसळला नाही. याविषयी कौतुक न करता अंनिससारख्या संघटना टीका करतात, हे दुर्दैवी आहे.
‘चंद्रयान-३’ मोहिमेचा एकूण व्यय ६१५ कोटी रुपये असून तो इतर देशांपेक्षा पुष्कळ न्यून असल्याचे मानले जाते. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी रशियाने चंद्रावर ‘लुना २५’ हे यान पाठवले; मात्र ते यान चंद्रावर कोसळले. रशियाने या यानासाठी १ सहस्र ५०० कोटी रुपयांहून अधिक पैसा व्यय केला होता. ज्या रशियाने केवळ भारताच्या ईर्षेपोटी घाईघाईने ‘लुना २५’ यान चंद्रावर पाठवले, ते केवळ तंत्रज्ञानाच्या आधारावर ! शेवटी हे यान कोसळल्याने नुसत्या तंत्रज्ञानाचा काय उपयोग झाला ? हे अंनिसने डोळ्यांत अंजन घालून पहावे. त्यामुळे तंत्रज्ञानासमवेत त्याला अध्यात्माची जोड देणे आवश्यक आहे. ‘देवता आणि संत यांच्या आशीर्वादाने कोणत्याही कार्यास प्रारंभ केल्यास, तर ते कार्य यशस्वी होते’, हे साधना न करणार्या नास्तिक अंनिसवाल्यांच्या लक्षात कधी येणार ?
आध्यात्मिक अधिष्ठान हवे !
पुरी पीठाधिश्वर शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद महाराज यांचे ‘इस्रो’ने अनेक वेळा साहाय्य घेतले आहे. त्यांच्याशी ‘नासा’नेही सल्लामसलत केली आहे. ऑक्सफर्डचे गणित तज्ञ आणि केंब्रिजचे अभ्यासकही पुरी पीठाधिश्वर शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद महाराज यांचे मार्गदर्शन घेतात. यावरून आपले ऋषि, महर्षि, संत सध्याच्या वैज्ञानिक शास्त्रज्ञापेक्षा किती विद्वान होते, हे स्पष्ट होते. महाभारतात भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद असल्यामुळे युद्धात पांडवांचा पराभव कधीही झाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज, समर्थ रामदासस्वामी आणि आई भवानीदेवी यांचे आशीर्वाद असल्याने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या सर्व गोष्टींचा विचार केल्यास वैज्ञानिक गोष्टींना मर्यादा असल्याने त्याला अध्यात्माची जोड दिल्यास जगात कोणतीही गोष्ट अशक्य होणार नाही. अशा अशक्य गोष्टी ‘इस्रो’ने करून दाखवल्या आहेत. त्यामुळे आजही उपग्रहांचे यशस्वीपणे प्रेक्षपण करायचे असेल, तर इतर देश भारताकडेच साहाय्य मागतात. ‘सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें । परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥’, असे समर्थ रामदासस्वामी यांनी म्हटले आहे. ‘इस्रो’कडे चळवळीचे सामर्थ्य असून ती भगवंताचे अधिष्ठान ठेवून कार्य करत असल्याने तिच्या मोहिमा यशस्वी होत आहेत, हे त्रिवार सत्य !
‘इस्रो’च्या चंद्रयानासह विविध मोहिमांच्या यशामागे भगवंताचे अधिष्ठान आहे, हे त्रिवार सत्य ! |