(म्हणे) ‘मणीपूरमधील हिंसाचार धार्मिकतेमुळे झालेला नाही !’ – अमेरिकेतील संघटनेचा निष्कर्ष

हिंसाचारामागे विदेशी हस्तक्षेप असल्याची वर्तवली होती शक्यता !

नवी देहली – ‘मणीपूरमधील हिंसाचार धर्माच्या आधारावर झालेला नाही’, असा निष्कर्ष अमेरिकेतील एका संस्थेने काढला आहे. ‘स्थानिक जमातींमधील एकमेकांवरील अविश्‍वास, आर्थिक परिणामांचे भय, अमली पदार्थ, फुटीरतावाद आणि इतिहासामध्ये घडलेल्या घटना यांचा हिंसाचारामागे संबंध आहे’, असे ‘फाऊंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडीज’च्या अहवालात म्हटले आहे. ‘या हिंसाचारामागे विदेशी हस्तक्षेप असल्याचे नाकारता येत नाही’, असेही अहवालात म्हटले आहे.

अहवालातील ठळक सूत्रे –

१. केंद्र सरकार आणि मणीपूर सरकार राज्यात शांतता निर्माण करण्यासाठी आणि हिंसाचारग्रस्तांच्या साहाय्यासाठी सर्व यंत्रणा राबवत आहेत.

२. काही फुटीरतावादी आणि कट्टरतावादी संघटना यांना या हिंसाचारामुळे सक्रीय होण्याची संधी मिळाली. अफू आणि हेरॉईन यांची तस्करी करणार्‍या माफियांनी या हिंसाचारासाठी अर्थपुरवठा केला.

३. गेल्या आठवड्यात हिंसाचारामध्ये घट झाली आहे; मात्र लोकांमध्ये अद्यापही अविश्‍वासाचे वातावरण आहे. विस्थापित झालेले अजूनही त्यांच्या मूळ ठिकाणी ते येऊ शकत नाहीत, अशी स्थिती आहे. शांतता निर्माण करण्यासाठी विश्‍वास निर्माण करण्याची, तसेच पुनर्वसनाचे काम करण्याची आवश्यकता आहे.

संपादकीय भूमिका

  • मणीपूरमध्ये हिंदु असलेल्या मैतेई समाजाला ख्रिस्ती असलेल्या कुकी समाजाने न्यायालयाचा आदेश असतांनाही ‘अनुसूचित जमाती’ म्हणून दर्जा देण्याला विरोध केल्याने हा हिंसाचार झाला आहे, हे जगजाहीर आहेे; मात्र ख्रिस्ती अमेरिकेतील संघटना हे जाणीवपूर्वक नाकारण्याचा प्रयत्न करत आहे, हे लक्षात घ्या !
  • विदेशी हस्तक्षेप असल्याची शक्यता वर्तवण्याला धर्म हाच आधार आहे, हेही लक्षात घ्यायला हवे. मैतेई हिंदु समाजाला विदेशातून साहाय्य मिळत नसून ख्रिस्ती कुकी यांना म्यानमारमधून शस्त्रपुरवठा केला जात आहे, हेही उघड झाले आहे.