(म्हणे) ‘पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर भारताच्या उत्पादनांवर लावणार कर !’-डोनाल्ड ट्रम्प

  • स्वार्थाने बरबटलेल्या अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांची भारताला धमकी !

  • अमेरिकेत अत्यल्प कर लावून भारतीय उत्पादने विकली जात असल्याचे प्रकरण

वॉशिंगटन (अमेरिका) – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताकडून अमेरिकी उत्पादनांवर लावण्यात आलेल्या उच्च कराचे सूत्र उपस्थित केले आहे. त्यांनी भारताला चेतावणी दिली की, पुढील वर्षी मी सत्तेत आल्यावर भारतावर कर लावीन. याला तुम्ही सूड म्हणा अथवा अन्य काही ! ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात भारताला ‘टॅरिफ किंग’ (करांचा राजा) असे संबोधले होते. ‘भारताने अमेरिकेला त्याच्या बाजारांमध्ये न्यायसंगत आणि उचित प्रकारे पोचू दिले नाही’, अशी टीका त्यांनी यापूर्वी केली होती.

ट्रम्प यांनी एका मुलाखतीमध्ये बोलतांना म्हटले की,

१. अमेरिकेने भारताला करांमध्ये पुष्कळ सूट दिली आहे, परंतु भारत अमेरिकेच्या उत्पादनांवर अत्यधिक दर लावत असतो. दोन्ही देशांकडून एक समान कर लावला जावा.

२. ‘हार्ले डेविडसन’ या दुचाकीच्या विक्रीसाठी भारत भरसमाठ कर लावतो. दुसरीकडे भारतीय दुचाकीवर कोणताही कर न लावता त्या अमेरिकेत विकल्या जातात.

संपादकीय भूमिका

अमेरिकेच्या अशा दादागिरीला भारत भीक घालणार नाही, हेही तितकेच खरे आहे ! भारतीय बाजारपेठेची अमेरिकेला आवश्यकता आहे, हे भारत जाणून आहे !