जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेला चीन गंभीर आर्थिक संकटात ! – विशेषज्ञांचे मत

सोव्हिएत संघासारखे तुकडे होण्याचीही वर्तवली शक्यता !

बीजिंग (चीन) – जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेला चीन सध्या वाढती बेरोजगारी आणि खालावत चाललेली अर्थव्यवस्था यांमुळे संकटात सापडला आहे. ४० वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने सोव्हिएत संघाची स्थिती बिकट झाली आणि त्याचे तुकडे झाले, तसाच प्रकार चीनच्या संदर्भातही होऊ शकतो, असे काही लोकांचे म्हणणे आहे.

१. विशेषज्ञांचे म्हणणे आहे की, गेल्या काही कालावधीत चीनचे चलन असलेल्या ‘युआन’चे मूल्य घसरले आहे.

२. ब्रिटीश वर्तमानपत्र ‘द गार्डियन’मध्ये अर्थव्यवस्थेच्या प्रकरणांवरील विशेषज्ञ असलेले लॅरी इलियट यांनी लिहिले की, चीनच्या साम्यवादी पक्षाला संरचनात्मक आर्थिक परिवर्तन करण्याची नितांत आवश्यकता आहे. तसेच तेथील कठोर राजकीय नियंत्रणाला अल्प केले पाहिजे.चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग एक शक्तीशाली व्यक्तीमत्त्व असून ते स्वातंत्र्य आणि लोकशाही यांना कोणतेही स्थान देण्यास सिद्ध होणार नाहीत. त्यामुळे आज ना उद्या चीन सोव्हिएत संघाच्या पथावर मार्गक्रमण करील. हे तसे पुष्कळ कठीण आहे. चीनच्या तुलनेत सोव्हिएत संघाची अर्थव्यवस्था पुष्कळ लहान होती.

३. मध्यंतरी ‘बीसीए रिसर्च’चे धवल जोशी यांचे एक संशोधन समोर आले होते. त्यानुसार चीनने गेल्या १० वर्षांत पुष्कळ वृद्धी केली असून जगाच्या एकूण अर्थव्यवस्था वाढीमध्ये एकट्या चीनचे तब्बल ४१ टक्के योगदान होते. हे अमेरिकेच्या २२ टक्के योगदानापेक्षा जवळपास दुप्पट आहे. संपूर्ण युरोपचे योगदान हे केवळ ९ टक्के होते.

४. इलियट यांच्या मते ‘कोव्हिड-१९’ महामारीच्या अंतर्गत लागलेल्या दळणवळण बंदीमुळे चीनची अर्थव्यवस्था खालावली, असे म्हणता येणार नाही. अर्थव्यवस्थेमध्ये आधीपासून मंदी येऊ लागली होती.

५. ‘पीटरसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स’चे अध्यक्ष ऍडम पोसेन यांनी म्हटले की, चीन गेल्या दशकातील मध्यापासूनच ‘मोठ्या आर्थिक कोव्हिड’च्या आहारी गेला होता.