युनायटेड किंगडमने खलिस्तान्यांवर आळा घालण्यासाठी केली १ कोटी रुपयांची तरतूद !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर केली घोषणा !

लंडन (युनायटेड किंगडम) – युनायटेड किंगडमने तेथे फोफावलेल्या खलिस्तानी आतंकवादावर आळा घालण्यासाठी ९५ सहस्र पाऊंड्सचा (१ कोटी भारतीय रुपयांचा) निधी घोषित केला आहे, अशी माहिती युनायटेड किंगडमचे संरक्षणमंत्री टॉम टुगेन्धात यांनी दिली. त्यांनी नुकताच भारताचा दौरा केला असून नवी देहलीत असतांना परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी त्यांची भेट घेतली होती. जयशंकर यांनी केलेल्या आग्रहामुळेच युनायटेड किंगडमने ही भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.

१. टुगेन्धात यांनी ‘एक्स’वरून (ट्विटरवरून) पोस्ट करत म्हटले की, भारताचा केंद्रीय अन्वेषण विभाग आमच्या गुप्तचर संघटनांसोबत जवळून कार्य करत असून गंभीर आणि योजनाबद्ध गुन्ह्यांना आम्ही एकत्रितरित्या हाताळत आहोत. डॉ. जयशंकर यांच्यासह माझी चांगली चर्चा झाली. कोणत्याही प्रकारच्या आतंकवादाच्या विरोधात उत्स्फूर्तपणे कार्य करण्यावर आमचा पूर्ण विश्‍वास आहे. डॉ. जयशंकर यांच्यासमवेत कार्य करण्याचा आम्ही प्रयत्न करू.

२. याआधी गेल्या मासात ७ जुलैला भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि युनायटेड किंगडमचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार टिम बॅरो यांचीही बैठक झाली होती. त्या वेळी भारताने युनायटेड किंगडममध्ये असलेल्या भारतीय उच्चायुक्तालातील अधिकार्‍यांना खलिस्तानी आतंकवाद्यांकडून मिळालेल्या धमक्यांवर गंभीर चिंता व्यक्त केली होती. त्या बैठकीत भारताने ब्रिटीश सरकारला या विरोधात कठोर भूमिका घेत खलिस्तानी आतंकवाद्यांवर कारवाई करून त्यांना भारताच्या स्वाधीन करण्याची अथवा न्यायालयीन खटले चालवण्याची मागणी केली होती. ६ जुलै या दिवशी खलिस्तानी आतंकवाद्यांनी तेथील भारतीय उच्चायुक्तालयाच्या बाहेर ‘किल इंडिया’ (भारताची हत्या करा) या नावाने मोर्चा काढला होता.

याआधी ३ जूनला डॉ. एस्. जयशंकर यांनी कॅनडा, अमेरिका, युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलिया या देशांना खलिस्तान्यांच्या विरोधात कठोर होण्याची मागणी केली होती. असे न केल्यास, आपल्या संबंधांवर परिणाम होईल, अशी स्पष्ट चेतावणीही जयशंकर यांनी दिली होती.
काही कालावधीपूर्वी ‘ब्लूम रिपोर्ट’ नावाच्या अहवालातून सांगण्यात आले होते की, युनायटेड किंगडममध्ये शीख समुदायाच्या तरुण आणि संस्कारक्षम मुलांच्या मनावर खलिस्तान्यांची शिकवण देण्याचा घाट घातला गेला आहे.

संपादकीय भूमिका

युनायटेड किंगडमसारखा श्रीमंत देश खलिस्तानी आतंकवाद निपटण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी तरतूद करतो, हे हास्यास्पद आहे. खलिस्तानी आतंकवाद्यांना कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. त्यामुळे त्यांनी जगात जाळे निर्माण केले आहे. युनायटेड किंगडम एवढ्या अल्प निधीची तरतूद करून भारताच्या तोंडाला पाने पुसत आहे !