१. पोटात असह्य वेदना होणे आणि आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्म करून ‘पित्ताशय’ काढण्याचा निर्णय घेणे
फेब्रुवारी २०२३ मध्ये माझ्या पोटात असह्य वेदना होत होत्या. मला जेवण जात नव्हते आणि झोपही लागत नव्हती. औषधोपचार करूनही वेदना थांबत नव्हत्या. तेव्हा ‘सोनोग्राफी’ची चाचणी (शरिराच्या आतील अवयवांची पहाणी करण्याची एक चाचणी) केल्यावर आधुनिक वैद्यांनी ‘माझ्या पित्ताशयात खडे झालेे असून जंतुसंसर्गही झाला आहे’, असे निदान केले. त्यामुळे आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्म करून ‘पित्ताशय’ काढण्याचा निर्णय घेतला.
२. शस्त्रकर्माच्या वेळी जाणवलेली सूत्रे
२ अ. साधिकेने शस्त्रकर्म होईपर्यंत अन्य साधकाला नामजपाला बसवणे आणि भ्रमणभाष करून धीर देणे : माझे शस्त्रकर्म २८.२.२०२३ या दिवशी झाले. त्या कालावधीत एका साधिकेने मला नामजपादी उपाय करण्यास सांगितले. तसेच तिने माझे शस्त्रकर्म होईपर्यंत अन्य साधकाला नामजपाला बसवले. तिने मला भ्रमणभाष करून धीर दिला. तेव्हा ‘तिच्या माध्यमातून गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉक्टर) माझी काळजी घेत आहे’, असे मला जाणवले.
२ आ. आधुनिक वैद्यांनी धीर देणे : शस्त्रकर्मगृहात जाण्यापूर्वी मला एक साधिका भेटली. ती तेथेच आधुनिक वैद्या होती. तिने मला धीर दिला. ती मला म्हणाली, ‘‘तुमच्याविषयी मी शस्त्रकर्म करणार्या वैद्यांना सांगितले आहे. तुमच्या वेदनेची वेळ संपत आली आहे. आता थोडे सहन करा.’’
२ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्मातून दर्शन होणे आणि त्यांनी ‘काही काळजी करू नका’, असे सांगून धीर देणे : शस्त्रकर्माच्या खोलीत गेल्यावर मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या तिन्ही गुरूंचे सूक्ष्मातून दर्शन झाले. मी त्यांच्या चरणी प्रार्थना केली. तेव्हा त्यांनी मला ‘काही काळजी करू नका’, असे सांगून आश्वस्त केले. गुरुमाऊलीने सूक्ष्मातून माझ्या डोक्यावर हात ठेवला होता. त्यांचा स्पर्श मला प्रत्यक्षात जाणवत होता. त्या क्षणी मला भूल देणार्या डॉक्टरांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि भूल देण्याचा ‘मास्क’ माझ्या तोंडावर लावला. काही क्षणांतच मी बेशुद्ध झाले. मी शुद्धीवर आल्यावर माझ्यासमोर साधिका बसली होती. तिला पाहून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच माझ्याजवळ बसले आहेत’, असे मला वाटले. माझे शस्त्रकर्म निर्विघ्नपणे पार पडले, यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.
३. शस्त्रकर्माच्या वेळी अनुभवलेली गुरुकृपा
३ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी माझी प्रेमाने विचारपूस केली आणि मला प्रसाद पाठवला.
३ आ. यजमानांनी पुष्कळ काळजी घेणे : प्रकृती ठीक नसतांना माझ्या यजमानांनी माझी पुष्कळ सेवा केली. ते मला सतत गुरुदेवांचे स्मरण करून देत होते. तसेच ते भ्रमणभाषवर नामजप लावून ठेवणे, कापूर आणि अत्तर यांचे उपाय करणे, असे करत होते. ते मला ‘परात्पर गुरु डॉक्टर आपल्याला साहाय्य करत आहेत, त्यांची आपल्यावर कृपा आहे’, असे सांगत होते. तेव्हा आमचा दोघांचाही भाव जागृत व्हायचा. यजमानांनी केलेल्या साहाय्यामुळे माझ्याकडून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
३ इ. मी आणि माझे यजमान रुग्णालयात असतांना एका साधिकेने माझ्या मुलीला सांभाळले.
३ ई. शस्त्रकर्माच्या वेळी माझी रक्तातील साखर (मधुमेह) वाढली होती. त्यासाठी मला ‘इन्सुलिन’ घ्यावे लागत होते. ‘इन्सुलिन’ घेणे, रक्तातील साखर तपासणे,या सगळ्या गोष्टी मला गुरुदेवांमुळे सहज करून घेता आल्या.
३ उ. शस्त्रकर्मानंतर माझी आई आणि माझ्या सासूबाई यांनी माझी काळजी घेतली. तेव्हाही मला गुरुदेवांच्या प्रती कृतज्ञता वाटली.
३ ऊ. शस्त्रकर्मासाठी पुष्कळ पैसे द्यावे लागतात; परंतु प्रत्यक्षात गुरुदेवांच्या कृपेमुळे आम्हाला अर्धाच व्यय करावा लागला. तेव्हा ‘देव आपली सर्व बाजूंनी काळजी घेतो’, हे लक्षात आले.
‘गुरुमाऊली, केवळ तुमच्या कृपेमुळेच माझा श्वास चालू आहे. या लेकराकडून आपल्या चरणांची सेवा अखंड करून घ्या. मला तुमच्या चरणांशी ठेवा, हीच आपल्या चरणी आर्ततेने प्रार्थना करते.’
– सौ. तन्वी सिमित सरमळकर, फोंडा, गोवा. (६.४.२०२३)
|