आज ८ ऑगस्ट २०२३ या दिवशी श्रीमती शुभांगी दामले यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने…
‘२८.७.२०२३ या दिवशी कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील वैद्य सुविनय दामले यांच्या आई आणि सनातनचे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक कै. विनायक दामले यांच्या पत्नी श्रीमती शुभांगी दामले यांचे निधन झाले. ८.८.२०२३ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्यांच्याविषयी त्यांची मुलगी सौ. मनीषा नितीन वाडीकर (कोल्हापूर) यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. आईला पोटात असह्य वेदना होत असल्यामुळे तिचे तातडीने शस्त्रकर्म करावे लागणे
‘२७.७.२०२३ या दिवशी (गुरुवारी) पहाटे माझा भाऊ वैद्य सुविनय याचा मला लघुसंदेश आला, ‘आईला पोटात असह्य वेदना होत असल्यामुळे मी तिला रुग्णालयात भरती करत आहे. आधुनिक वैद्य सकाळी ९ वाजता तिचे ‘स्कॅनिंग’ करणार आहेत.’ त्यानंतर त्या दिवशी १०.३० वाजता मला पुन्हा सुविनयचा भ्रमणभाष आला, ‘‘आईच्या पोटात गाठ आहे. तिचे तातडीने शस्त्रकर्म करावे लागणार आहे.’’ त्याचे बोलणे ऐकून मी लगेच कुडाळ येथे जायला निघाले. मी संध्याकाळी ५ वाजता कुडाळ येथे पोचले, तेव्हा आईचे शस्त्रकर्म झाले होते. ती अतीदक्षता विभागात होती. तिला अशी झोपून राहिलेली मी कधी पाहिले नव्हते.
२. आईचे शस्त्रकर्म चांगले होणे; मात्र तिची प्रकृती गंभीर असणे
सुविनय म्हणाला, ‘‘आईचे शस्त्रकर्म चांगले झाले; पण तिची प्रकृती गंभीर आहे. ‘तिचे वय पहाता आधुनिक वैद्यांनी तिचे शस्त्रकर्म केले’, हेच नशीब !’’ शस्त्रकर्म झाल्यावर तिला ‘व्हेंटिलेटर’वर (रुग्णाला श्वासोच्छ्वासाठी साहाय्य करणारे यंत्र) ठेवावे लागले. रात्री ८.३० वाजता आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘कालपासून आईंना लघवी झाली नाही. त्यामुळे त्यांचा एखादा अवयव खराब होऊ शकतो. त्यांना लघवी झाली नाही, तर ‘डायलिसिस’ (टीप) करावे लागेल.’’
(टीप : डायलिसिस : मूत्रपिंडांची कार्यक्षमता न्यून झाल्याने रक्तातील अशुद्ध घटक आणि अधिक मात्रेतील द्रवपदार्थ यंत्राद्वारे शरिरातून बाहेर काढून टाकण्याची प्रक्रिया )
३. साधिकेने आईसाठी नामजपादी उपाय करणे आणि त्याचा लाभ होऊन तिच्या आईचे ‘डायलिसिस’ करावे न लागणे
मी मायाताईंना (वैद्या सुश्री (कु.) माया पाटील यांना) भ्रमणभाष करून सगळी कल्पना दिली आणि नामजप विचारला. रात्री ९.३० वाजता त्यांचा मला भ्रमणभाष आला, ‘‘आईंची प्राणशक्ती न्यून झाली आहे. त्यांची प्राणशक्ती वाढण्यासाठी प्रार्थना करून ‘ॐ’चा नामजप न्यास आणि मुद्रा यांसह ३ घंटे करा.’’ मी लगेच रात्री ९.३५ वाजता नामजप करायला बसले. रात्री १० वाजता आधुनिक वैद्यांनी मला सांगितले, ‘‘आईंना लघवी झाली नाही, तर ४ घंट्यांनी, म्हणजे रात्री २ वाजता ‘डायलिसिस’ करूया.’’ १२.३५ वाजता मी आईसाठी करत असलेल्या नामजपाचे ३ घंटे पूर्ण होणार होते. रात्री १.४५ वाजता आधुनिक वैद्यांनी मला अतीदक्षता विभागात बोलावले आणि लघवीची पिशवी दाखवून म्हणाले, ‘‘आईंना लघवी झाली आह़े. सुदैवानेच असे होते. त्यामुळे आता त्यांचे ‘डायलिसिस’ करण्याची आवश्यकता नाही.’’
‘नामस्मरणाचे उपाय किती उपयुक्त आहेत’, याचे महत्त्व मला पटले.
४. आईसाठी नामजप करतांना आलेल्या अनुभूती
अ. मी आईसाठी नामजप करत असतांना मला डोळ्यांसमोर पिवळा प्रकाश आणि आईच्या हृदयात निळा प्रकाश दिसत होता.
आ. ‘आईला प.पू. डॉक्टरांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) धरले असून ते तिच्यावर उपाय करत आहेत. ते तिला धीर देत आहेत. श्रीकृष्ण आईशी बोलत आहे’, असे मला जाणवले.
इ. तिथून निघतांना माझा आपोआप ‘महाशून्य’ हा नामजप सतत होऊ लागला.
मी सूक्ष्मातून प.पू. डॉक्टरांना म्हणाले, ‘तुम्ही आईच्या समवेत आहात. तुम्ही तिच्यासाठी योग्य तेच कराल.’ त्यानंतर माझे मन स्थिर आणि निश्चिंत झाले.
५. २८.७.२०२३ या दिवशी सकाळी आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘आईंच्या प्रकृतीत सुधारणा नाही.’’ दुपारी २ वाजता आईचे निधन झाले.
६. आईची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
६ अ. प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. डॉ. आठवले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली वास्तू ! : आई-वडिलांंनी पुष्कळ कष्ट करून घर बांधले. वर्ष १९९५ मध्ये त्या वास्तूत प.पू. भक्तराज महाराज यांची शेवटची गुरुपौर्णिमा झाली. तेव्हा प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. डॉक्टर यांनी ‘ही वास्तू मंगलमय होणार आहे’, असे सांगितले होते.
६ आ. प्रामाणिकपणे कष्ट करणे : तिने अनेक व्यवसाय केले आणि त्यात यशस्वीही झाली. ती प्रामाणिकपणे कष्ट करत असे. तिला फळाची अपेक्षा नव्हती.
६ इ. काटकसरी : अन्न वाया जाऊ न देता ती शेष राहिलेल्या पदार्थापासून दुसरा रुचकर पदार्थ बनवत असे.
६ ई. धार्मिक : आई धार्मिक वृत्तीची होती. तिला श्रीरामरक्षास्तोत्र आणि देवीस्तोत्र मुखोद़्गत होते. ती प.पू. भक्तराज महाराज यांची भजने म्हणत असे. मला आई-वडिलांमुळेच अध्यात्माची गोडी लागली.
६ उ. प्रेमभाव
१. ती घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आग्रहाने खायला दिल्याविना पाठवत नसे.
२. तिचे ‘हे विश्वचि माझे घर !’ या उक्तीनुसार आचरण होते. ‘कुणाला फार जवळ केले किंवा एखाद्याला दूर केले’, असे तिचे कधीच नव्हते. तिचे सर्वांवर समान प्रेम होते.
३. ‘माऊली’, म्हणजे सर्वांना मायेची ऊब देणारी ! ‘आई’ या मायेतील शब्दाच्या जागी ‘माऊली’ हा शब्द वापरल्यावर त्याचा अर्थ पालटून तो व्यापक होतो. तशी आई पुष्कळ व्यापक होती.
एकदा प.पू. डॉक्टर तिला म्हणाले, ‘‘आई, तुम्हाला केवळ २ मुलगे नाहीत, तर हे सगळे साधक, म्हणजे तुमची मुलेच आहेत.’’
६ ऊ. आसक्ती नसणे
६ ऊ १. भूमीच्या मोबदल्याचे मिळालेले सर्व पैसे नातेवाइकांना देणे : अलीकडेच मार्ग मोठा करण्यासाठी सरकारने आईची भूमी नियंत्रणात घेतली आणि त्याचे तिला पैसे दिले. ते पैसे तिने स्वतःसाठी न ठेवता पुतणे, भाचे आणि नातवंडे यांना दिले. तिच्याकडे येणार्या कामवाल्या बायकांनाही तिने पैसे दिले. तिने वृद्धाश्रमांना देणगी दिली.
६ ऊ २. भूमी आणि घर मुलांना देणे अन् स्वतःजवळ केवळ ६ साध्या साड्या ठेवणे : तिने भूमी आणि घर यांच्या २ मुलांमध्ये वाटण्या केल्या. तिच्या जवळजवळ ५० साड्या तिने कामवाल्या बायकांना दिल्या. तिच्या कपाटात केवळ प्रतिदिन नेसायच्या ६ च साड्या होत्या.
ते पाहून मला वाटले, ‘वास्तुदेवता प्रसन्न होऊन तिने आईला भरभरून आशीर्वाद दिला असेल.’ मला प.पू. डॉक्टरांप्रती फार कृतज्ञता वाटली. ‘वयाच्या ८३ व्या वर्षी एवढे पैसे हातात येऊन आईला समाधान लाभणे’, हे खरेच प.पू. डॉक्टरांचेच नियोजन होते.’
६ ऊ ३. उतारवयातही चिकाटीने औषधोपचार घेणे : गेल्या वर्षी ती आमच्या घरी आली असतांना पडली. तिच्या खांद्यात अस्थिभंग झाला होता. तेव्हा आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘शस्त्रकर्म करावे लागेल’’; पण आई त्यासाठी सिद्ध नव्हती. नंतर तिने आयुर्वेदीय उपचार घ्यायचे ठरवले. तिने चिकाटीने प्रत्येक आठवड्याला पुणे येथे जाऊन उपचार करून घेतले. तिला ‘प्लास्टर’ न घालता किंवा शस्त्रकर्म न करता ४ मासांत तिचा हात पूर्ण बरा झाला.
६ ए. भाव
६ ए १. ती घरात केलेला प्रत्येक पदार्थाचा देवाला नेवैद्य दाखवत असे आणि नंतर दोन्ही मुलांना सम प्रमाणात देत असे.
६ ए २. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना भेटायला जातांना त्यांच्या आवडीचा खाऊ आवर्जून नेणे : ती रिक्त हस्ते कधीच श्री गुरूंकडे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडे) गेली नाही. ती प्रत्येक वेळी स्वतः काहीतरी पदार्थ करून घेऊन जात असे. प.पू. डॉक्टरांना आवडतो तो पदार्थ ती आवर्जून करून घेऊन जात असे. ती काही धान्यांची पिठे एकत्र करून घावन किंवा थालीपिठे करून नेत असे. त्यामागची तिची निरागसता, प्रेमभाव आणि भाव देवालाही (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनाही) आवडत असे. प.पू. डॉक्टरही तो पदार्थ आवडीने खात असत.
६ ए ३. ‘सनातनचे ३२ वे (व्यष्टी) संत पू. सौरभ जोशी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले एकच आहेत’, असा भाव असणे : ती नेहमी पू. सौरभदादांना (सनातनचे ३२ वे (व्यष्टी) संत पू. सौरभ जोशी यांना) भेटायला जात असे. ती ‘प.पू. डॉक्टरांना भेटायला जात आहे’, असा भाव ठेवून पू. सौरभदादांसाठी प्रत्येक वेळी खाऊ नेत असे. ती पू. सौरभदादांना भेटायला गेल्यावर तिला आणि पू. सौरभदादा यांना आनंद होत असे.
६ ऐ. उतारवयातही स्वतःत पालट करण्याच्या तीव्र तळमळीमुळे ‘राग येणे’ हा लहानपणापासून असलेला स्वभावदोष दूर होणे : आई तापट स्वभावाची होती.
प.पू. डॉक्टरांनी ‘स्वभावदोष नाहीसे झाल्याविना देवापर्यंत पोचता येत नाही’, असे सांगितले आहे. आई सकारात्मक राहून ‘राग येणे’ हा स्वभावदोष घालवण्यासाठी स्वयंसूचना देत असे, तरी मध्येच केव्हातरी तिचा राग उफाळून येत असे. ‘आपला राग अल्प होत नाही’, याची जाणीव असल्यामुळेच तिने मे २०२३ मध्ये ज्योतिषतज्ञ (सौ.) प्राजक्ता जोशीताईंना ‘माझा राग न्यून होण्यासाठी काही उपाय आहे का ?’, असे विचारले होते. सौ. प्राजक्ता जोशी यांनी आईला ‘नृसिंहवाडीला जाऊन एक होम करावा लागेल’, असे सांगितले. त्यानुसार ती माझ्याकडे कोल्हापूर येथे आली. ती मला आणि माझे मामा-मामी यांना समवेत घेऊन नृसिंहवाडीला जाऊन होम करून आली.
‘राग येणे’ हा स्वभावदोष न्यून करण्याची तिची तळमळ आणि त्यासाठी तिने इतरांचे साहाय्य घेऊन केलेले प्रयत्न’ मला बरेच काही शिकवून गेले. प.पू. डॉक्टरांंच्या ‘ब्रह्मोत्सवा’निमित्त तिने ‘राग येणे’ हा स्वभावदोष दूर करण्याचा संकल्प केला होता. तसे तिने बोलूनही दाखवले होते. त्यानंतर मात्र ‘ती कधी रागावली आहे’, असे आम्ही पाहिले नाही.
‘तिच्यासारखी प्रयत्न करण्याची तळमळ आणि श्रद्धा आमच्यात निर्माण होवो’, हीच प.पू. डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना !’
– सौ. मनीषा वाडीकर, कोल्हापूर (४.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |