‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी आल्यावर शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

कु. जिगिषा म्हापसेकर

१. सेवा करतांना सेवेविषयी अनेक बारकावे आणि पैलू लक्षात येऊन पुष्कळ शिकता येणे

‘वर्ष २०२२ मध्ये झालेल्या ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी आले होते. तेव्हा मला स्वच्छतेची सेवा मिळाली होती. ही सेवा करतांना मला सेवेतील बारकावे आणि पैलू लक्षात घेऊन ‘सेवा परिपूर्ण कशी करायची ?’, हे शिकता आले.

२. रामनाथी आश्रमात असतांना इतरांविषयी प्रतिक्रिया येऊ लागल्यावर ‘प्रतिक्रिया येऊ नयेत’, यासाठी गुरुस्मरण करत असल्यामुळे घरी गेल्यावरही प्रतिक्रिया येण्यापूर्वीच मनात गुरुस्मरण चालू होणे

स्वच्छतेची सेवा करतांना कधी कधी माझ्या मनात सहसाधिकेविषयी प्रतिक्रिया यायच्या, तेव्हा मी गुरुस्मरण करून प.पू. गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना) आत्मनिवेदन करत असे. अधिवेशनानंतर घरी गेल्यावरही सेवा करतांना, साधक आणि मैत्रिणी यांच्याशी बोलतांना माझ्या मनात प्रतिक्रिया येण्यापूर्वीच माझा ‘प.पू. गुरुदेव, प.पू. गुरुदेव’, असा नामजप आपोआप चालू व्हायचा. ही गोष्ट काही दिवसांनी माझ्या लक्षात आली.

३. ‘अनावश्यक गोष्टींचा विचार करण्यापेक्षा ईश्वराचा विचार करणे आणि त्यात रमणे’, हे अधिक चांगले’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शिकवणीमुळे अनावश्यक बोलणे चालू असतांना मनात गुरुस्मरण चालू होणे

एकदा महाविद्यालयामध्ये माझ्या समवेत एक प्रसंग घडला. आम्ही सर्व मैत्रिणी एकत्र बसलो होतो. त्या सर्व गप्पा मारत होत्या. तेव्हा माझ्या मनात ‘प.पू. गुरुदेव’, असा नामजप चालू झाला. मध्येच मैत्रिणींनी मला काहीतरी विचारले; पण ‘मैत्रिणी काय बोलत होत्या’, याकडे माझे लक्षच नव्हते. मी तिथून निघून गेले. नंतर माझ्या लक्षात आले, ‘गुरुदेव सांगतात, ‘अनावश्यक गोष्टींचा विचार करण्यापेक्षा ईश्वराचा विचार करणे आणि त्यात रमणे’, हे अधिक चांगले.’ तेव्हा ‘गुरुदेव मला किती साहाय्य करतात’, असे वाटून मला कृतज्ञता वाटली.

४. कृतज्ञता

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, आपल्याच कृपेमुळे मला ही अनुभूती घेता आली. आपल्या अपार कृपेमुळे मला प्रतिक्रियांवर मात करता येत आहे. कोटीशः कृतज्ञता गुरुदेव !’

– आपली,
कु. जिगिषा (जिंकण्याची इच्छा असणारी) दर्शन म्हापसेकर (वय १७ वर्षे), ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग. (६.६.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक