पुण्‍यात आतंकवाद्यांना आश्रय देणारा कादीर पठाण आहे ‘तबलिगी जमात’चा कार्यकर्ता !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने अटक केलेले इम्रान खान आणि म. युसूफ साकी यांना पुण्‍यात रहाण्‍यासाठी घर देणारा गोंदियातील कादीर दस्‍तगीर पठाण याला आतंकवादविरोधी पथकाच्‍या अधिकार्‍यांनी अटक केली आहे. त्‍याच्‍याकडून कसून चौकशीसाठी त्‍याला ३० जुलै या दिवशी पुन्‍हा गोंदियात आणण्‍यात आले होते. त्‍याची चौकशी करून त्‍याच्‍या संगणकातील डाटा ‘ए.टी.एस्.’ने घेतला आहे. तो पुण्‍यातील ‘तबलिगी जमात’चा कार्यकर्ता असल्‍याचे लक्षात आले आहे.

६ वर्षांपूर्वी तो पुण्‍याच्‍या ‘फैदाने मदिना मस्‍क’, ‘ब्राइट फ्‍युचर स्‍कूल’ या ठिकाणी राहू लागला. पुण्‍यात आल्‍यावर अहले-हदीसचे अनुसरण करू लागला. पुण्‍यातील तबलिगी जमात मस्‍का येथे त्‍यांचा संवाद आणि वागणे यांमुळे कादीर त्‍यांच्‍याकडे आकर्षित झाल्‍याची माहिती त्‍याने चौकशी करणार्‍या यंत्रणेला दिली.

आतंकवाद्यांनी बाँब सिद्ध करण्‍यासाठी मिनी प्रयोगशाळा थाटल्‍याचे अन्‍वेषणात निष्‍पन्‍न !

आतंकवाद्यांनी बाँब सिद्ध करण्‍यासाठी ‘मिनी प्रयोगशाळा’ थाटल्‍याचे अन्‍वेषणात निष्‍पन्‍न झाले आहे. ती प्रयोगशाळा शोधून काढत बाँब बनवण्‍याचे साहित्‍य जप्‍त केले असल्‍याची माहिती ‘ए.टी.एस्.’च्‍या वतीने देण्‍यात आली आहे. महमंद खान या आतंकवाद्याने बाँब बनवण्‍यासाठी केमिकल्‍स आणि प्रयोगशाळेतील उपकरणे एका ठराविक ठिकाणी लपवून ठेवली होती. ‘ए.टी.एस्.’ने केलेल्‍या अन्‍वेषणात त्‍याने केमिकल्‍स आणि उपकरणे ‘ए.टी.एस्.’ला काढून दिली आहेत.