१. मिळेल ती सेवा स्वीकारणे
१ अ. तांत्रिक सेवा आवडणार्या साधकाला अन्य सेवा कराव्या लागणे : ‘एका साधकाने एक प्रसंग सांगितला, ‘मला तांत्रिक (टेक्निकल) सेवा आवडते. मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. तेव्हा तेथे मला तांत्रिक (टेक्निकल) सेवा सोडून इतर सर्व सेवा मिळाल्या. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘जे मला आवडते, ते मिळत नाही.’
१ आ. ‘जी सेवा मिळाली आहे, तीच करणे’, हे आपले ध्येय असायला हवे : त्या साधकाला सद़्गुरु डॉ. पिंगळेकाका यांनी सांगितले, ‘‘मला तांत्रिक (टेक्निकल) सेवा आवडते’, हा विचार ठीक आहे; परंतु ‘मला आता जी सेवा मिळाली आहे, तीच सेवा करायची आहे’, असे आपले ध्येय असले पाहिजे.’’
२. प्रत्येक सेवेचे नियोजन कौशल्याने करण्यातून होणारी साधना
आपल्याला जसे शक्य आहे, तसे आपल्याला मिळालेल्या सेवेचे नियोजन करणे, हे आपले क्रियमाण आहे. त्यानंतर जी परिस्थिती वर्तमानकाळात समोर येते, ती ईश्वरेच्छा समजून स्वीकारणे, ही आपली साधना आहे.
३. सेवेतून होणारी देहशुद्धी
भगवंताच्या सेवेसाठी आपण ज्या ज्या गोष्टींचा उपयोग करतो, ती ती शुद्ध होत असते. आपले शरीर, मन, बुद्धी आणि अहंकार सर्वच भगवंताच्या सेवेत लावले, तर आपली सर्वांगाने परिपूर्ण शुद्धी होणे शक्य आहे.
३ अ. आपण ईश्वराला जे काही निरपेक्षपणे अर्पण करतो, ते शुद्ध होऊन आपल्या ईश्वरप्राप्तीचे माध्यम होत जाते.
४. सेवेच्या अनुषंगाने स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्वरेच्छा
४ अ. सेवा आणि स्वेच्छा : सेवा करतांना स्वेच्छेने निवडून केली, तर आपला अहं जागृत होऊन आपला अहं वाढेल. स्वेच्छेमुळे ना साधना होईल, ना ईश्वरप्राप्ती !
४ आ. सेवा आणि परेच्छा : सेवा करतांना परेच्छा असेल, तर इतरांशी (ईश्वराच्या अनेक रूपांशी) एकरूप होण्याची गती वाढेल, अहं न्यून होईल. ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे.
४ इ. सेवा आणि ईश्वरेच्छा : सेवेमध्ये ईश्वरेच्छा असेल, तर अहं नष्ट होईल. ईश्वराशी एकरूप होण्याची गती वाढेल. ही सर्वांत चांगली प्रक्रिया आहे आणि यामुळे ईश्वरप्राप्ती सहज सुलभतेने होते.
५. सेवेच्या संदर्भातील नियम
सेवा करतांना आपण जे रूजवतो, तेच कितीतरी पटींनी आपल्याला परत लाभते, हाच नियम आहे.
६. स्वतःला मिळालेल्या सेवेचे दायित्व आणि आपली पात्रता ओळखणे
एखाद्याला मिळालेल्या दायित्वावरून त्याची ओळख होत नाही, तर ‘कोणत्याही प्रसंगाकडे पहाण्याचा त्याचा दृष्टीकोन काय आहे ?’, हीच त्याची पात्रता किंवा ओळख असते.
अ. एखाद्या साधकाला एखाद्या सेवेचे दायित्व मिळाल्यास ‘ते दायित्व मिळणे, ही दायित्व पेलण्यासाठी पात्र होण्याची संधी आहे कि त्याची पात्रता आहे ?’, हे त्या साधकाच्या लक्षात येणे शक्य नसते.
आ. एखाद्याने कोणत्याही प्रसंगात पुढाकार (नेतृत्व) घेऊन एखादी समस्या सोडवली, तर भलेही त्याच्याकडे त्याचे दायित्व (अधिकार) नसेल; परंतु ते दायित्व घेण्यासाठी तो पात्र असल्याचे त्याची स्थिती दर्शवते.
इ. एखाद्या सेवेचे दायित्व नसूनही पात्रतेनुसार ती सेवा करणे, हे आध्यात्मिक प्रगतीसाठी उपयुक्त असते.
ई. एखाद्याकडे एखाद्या सेवेचे दायित्व असेल आणि त्यासाठी त्याची पात्रताही असेल, तर तो ती सेवा अधिक परिपूर्ण करू शकतो.
उ. दायित्व मिळाल्यावर साधकांनी स्वत:मध्ये पात्रता नसल्यास ती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, हीच त्यांची साधना असते.’
– संग्राहक, सुश्री पूनम चौधरी, देहली सेवाकेंद्र, देहली.
(१३.१.२०२३)