पणजी, २८ जुलै (वार्ता.) – गोवा राज्यात गेल्या साडेपाच वर्षांत आजी-माजी आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, पंचसदस्य आणि इतर लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात १३५ गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. यामधील ५९ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत, तर १६ प्रकरणांचे पोलीस अन्वेषण करत आहेत. ही माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत एका प्रश्नावर लेखी उत्तरात दिली. काँग्रेसचे हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी हा प्रश्न विचारला होता.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लेखी उत्तरात पुढील माहिती दिली आहे. लोकप्रतिनिधींच्या विरोधात वर्ष २०१८ मध्ये ११, वर्ष २०१९ मध्ये १२, वर्ष २०२० मध्ये ११, वर्ष २०२१ मध्ये २१, वर्ष २०२२ मध्ये ७५ गुन्हे, तर १ जानेवारी ते ३० जून २०२३ या कालावधीत ५ गुन्हे मिळून एकूण १३५ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यातील सर्वाधिक गुन्हे हे कोरोना महामारीच्या काळातील नियमांचे उल्लंघन केल्याच्या संदर्भात आहेत. १३५ पैकी १ प्रकरण उच्च न्यायालयाने रहित केले, ३१ प्रकरणांत आरोपींची निर्दोष मुक्तता झाली, ३ प्रकरणांत खटले रहित करण्यात आले, तर एका प्रकरणात पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. सर्वाधिक गुन्हे हे भाजपचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्या विरेाधात, तर मंत्री रोहन खंवटे, मंत्री नीलेश काब्राल, ‘गोवा फॉरवर्ड’चे फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई, भाजपच्या शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांच्या विरोधात प्रत्येकी २, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, मंत्री सुभाष फळदेसाई, मंत्री नीळकंठ हळर्णकर, भाजपचे मडगावचे आमदार दिगंबर कामत, ‘आप’चे बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस, भाजपचे आमदार आलेक्स सिक्वेरा, भाजपचे आमदार संकल्प आमोणकर, भाजपचे आमदार उल्हास तुयेकर यांच्या विरोधात प्रत्येकी १ गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. माजी आमदारांपैकी विल्फ्रेड डिसा यांच्या विरोधात २, तसेच चर्चिल आलेमाव, दामू नाईक, बाबू आजगावकर, आवेर्तान फुर्तादो आणि डॉम्निक गावकर यांच्या विरोधात प्रत्येकी १ गुन्हा नोंद करण्यात आला आहे.’’