सर्जनशील स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतीय संस्कृतीचा अवमान होऊ देणार नाही ! – केंद्र सरकार

अनुराग ठाकूर

नवी देहली – ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’चा (चित्रपट आदी पहाण्याच्या ऑनलाईन माध्यमाचा) वापर सर्व वयोगटांतील लोक करत आहेत. त्यामुळे या व्यासपिठाच्या प्रसारकांना (‘ब्रॉडकास्टर्स’ना) ‘त्यांच्या व्यासपिठाचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी करण्यात येऊ नये’, असे सांगण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. ‘ओटीटी प्लॅटफॉर्म्स’च्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.


ठाकूर पुढे म्हणाले की, सरकार सर्जनशील स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतीय संस्कृती आणि समाज यांचा अवमान होऊ देणार नाही. ओटीटीवर दाखवल्या जाणार्‍या असभ्य आणि अपमानास्पद ‘वेब सिरीज’मधील मजकुरावर आळा घालण्याची आवश्यकता आहे, असे बैठकीत सर्वांना सूचित करण्यात आले. (केवळ तोंडी सूचना देण्यापेक्षा यावर आळा घालणारा कायदा करणे आवश्यक आहे, असे हिंदु धर्मप्रेमींना वाटते ! – संपादक)