मोगरा नाल्यावरील अतिक्रमणाची चौकशी करून कारवाई करू ! – उदय सामंत, उद्योग मंत्री

विधानसभा अधिवेशन

मुंबई – अंधेरी पश्चिममधील ‘क’ विभाागातील मोगरा नाल्याची रुंदी अल्प करणे, वळण पालटणे, तसेच त्यावर अतिक्रमण करून बांधकाम करणे याची सखोल चौकशी करू. चौकशीतून अतिक्रमण झाल्याचे निष्पन्न झाल्यास कारवाई करू, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेतील तारांकित प्रश्नोत्तराच्या वेळी दिले.


मोगरा नाल्याची रुंदी अल्प केल्याने अंधेरी सब-वेमध्ये पाणी साचून सब-वे बंद होतो. बांधकाम व्यावसायिकांसाठी अनेक ठिकाणी नाल्याचे वळण पालटणे, त्यावर अनधिकृत बांधकामे करणे, नाल्याची रुंदी अल्प करणे आदी प्रयत्न केले जात असल्याचे उपप्रश्नांतून आमदारांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

मोगरा नाल्याचे बांधकाम हे महानगरपालिकेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार केले आहे. ते जर चुकीच्या पद्धतीने केले गेले आहे, तर महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांवर तसेच ठेकेदारांवर कारवाई करणार का ? असाही प्रश्न विचारण्यात आला.