गोवा : ‘बालरथ’ कर्मचार्‍यांना समाधानकारक वेतनवाढ देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

गोवा विधानसभा अधिवेशन

पणजी, १८ जुलै (वार्ता.) – ‘बालरथ’ (लहान मुलांना शाळेत ने-आण करणारी छोटी बस) चालक आणि वाहक यांनी १७ जुलैपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचे पडसाद १८ जुलै या दिवशी विधानसभेत उमटले. या प्रकरणी शिक्षण खाते सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘बालरथ’च्या संघटनेशी १८ जुलै या दिवशी सकाळी मी चर्चा केली आहे. ‘बालरथ’च्या कर्मचार्‍यांना प्रतिवर्ष ३ टक्के वेतनवाढ, वर्षाकाठी १० ऐवजी ११ मास वेतन, चालकाला शाळेच्या व्यवस्थापनाने सेवेतून काढू नये यासाठी प्रावधान आणि चालकाचा विमा उतरवणे, असे निर्णय शासनाने घेतले आहेत. यावर विरोधी आणि सत्ताधारी गटातील आमदारांनी ‘बालरथ’च्या चालकांना प्रतिमास २० सहस्र, तर वाहकाला १४ सहस्र ५०० रुपये वेतन देण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १९ जुलै या दिवशी ‘बालरथ’च्या कर्मचारी संघटनेकडे पुन्हा चर्चा करून त्यांना समाधानकारक वेतनवाढ देणार असल्याचे घोषित केले. बालरथ कर्मचारी संघटनेने त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे घेणार नसल्याचे म्हटले आहे.

(सौजन्य : In Goa 24×7) 

सरकारी शाळा बंद पडण्यास ‘बालरथ’ सेवा उत्तरदायी

‘बालरथ’ चालक आणि वाहक यांच्या संपाविषयी बोलतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘बालरथ’ सेवा ही इयत्ता ५ ते १० वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केवळ शाळेपासून ३ कि.मी. अंतरावर असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यासाठीच होती; मात्र आता ‘बालरथ’च्या बसगाड्या शाळेपासून १५ कि.मी. अंतरावरील विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी वापरल्या जात आहेत.

‘बालरथ’च्या सेवेमुळेच सरकारी शाळा बंद पडल्या आहेत. काही शाळांचे व्यवस्थापन खासदार निधीतून बसगाड्या घेऊन त्या दूरच्या विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी वापरत आहेत. ‘बालरथ’ सेवा केवळ शाळेपासून ३ कि.मी. परिघापर्यंत चालू असली असती, तर ती सेवा सुरळीत असली असती.’’