रत्नागिरी – गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाच्या नूतनीकरणाविषयी येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक आणि विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ रत्नागिरी यांनाही देण्यात आली. या वेळी मनसे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, सुनील साळवी, अजिंक्य केसरकर, गौरव चव्हाण उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की,
१. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम हे मातीचे मोठे ढिगारे, खड्डे आणि उभारलेले काही खांब या पलीकडे गेलेले दिसत नाही.
२. शासन दरबारी अनेक बैठका पार पडूनही बसस्थानकाच्या रखडलेल्या कामाचा जनतेला मनस्ताप सोसावा लागत आहे.
३. बस पकडण्यासाठी महिला, मुले, आबालवृद्धांना भर पावसात, तर उन्हात उभे रहावे लागत आहे.
४. सकाळच्या सत्रात वाहनांची प्रचंड वर्दळ आणि बस पकडणार्या प्रवाशांची लगबग, गर्दी यामुळे होणारी प्रचंड वाहतूककोंडी अन् त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
५. पुढील १० दिवसांत तात्काळ हे काम चालू न झाल्यास रत्नागिरीकरांच्या असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने आक्रमक आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
हे वाचा :
#Exclusive : रत्नागिरी बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच सोडले जाते मुतारीचे सांडपाणी !