भ्रमणभाष चोरीला गेल्याची तक्रार करण्यासाठी गेलेल्या तरुणीला पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांत ४.३० घंटे हेलपाटे मारायला लावले !

  • छत्रपती संभाजीनगर येथील प्रकार

  • तरुणी रडकुंडीला !

छत्रपती संभाजीनगर – ‘सायंकाळ झाल्यानंतर महिलेला पोलीस ठाण्यात बोलावू नये, तसेच तिची तक्रार असल्यास ती तात्काळ सोडवावी’, असा नियम आहे; मात्र भ्रमणभाष चोरीची तक्रार नोंदवण्यासाठी एका तरुणीला छावणी पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांत साडेचार घंटे हेलपाटे मरायला लावले. यामुळे ही तरुणी अक्षरश: रडकुंडीला आली. त्यानंतर मध्यरात्री १२.३० वाजता गुन्हा नोंदवण्यात आला.

एका खासगी आस्थापनात काम करणार्‍या तरुणीचा भ्रमणभाष १६ जूनच्या रात्री ८ वाजण्याच्या सुमारास लिटल फ्लॉवर शाळेच्या चौकातून २ चोरट्यांनी हिसकावला. याची तक्रार करण्यासाठी तरुणी छावणी पोलीस ठाण्यात गेली. तेथे तक्रार घेण्याऐवजी तिला ‘सायबर’ शाखेत पाठवण्यात आले. त्यानंतर ती मिल कॉर्नर येथील पोलीस आयुक्तालयात गेली. तेथे तिला ‘सायबर विभाग सायंकाळी ६ वाजता बंद होतो, तुम्ही उद्या या’, असे उत्तर मिळाले. त्यामुळे तरुणी पुन्हा एकदा छावणी पोलीस ठाण्यात गेली. रडकुंडीला आलेल्या तरुणीला पाहूनही पोलिसांनी दुर्लक्ष केले. अंततः विनवण्या केल्यानंतर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास तिची तक्रार घेण्यात आली.

शहरातील भ्रमणभाषसंच चोरींच्या घटनांकडे पोलिसांचा कानाडोळा !

मागील ६ मासांत रेल्वेस्थानक, एम्. वाळूज, सिडको, सातारा आदी भागांतून भ्रमणभाषसंच चोरीच्या घटना समोर आल्या. भ्रमणभाषसंच गहाळ आणि चोरी या प्रकारांत पोलीस तक्रार प्रविष्ट करण्यास नेहमी टाळाटाळ करतात. गुन्ह्यांची संख्या वाढू नये, यासाठी पोलीस केवळ भ्रमणभाष गहाळ झाल्याचा अर्ज भरून घेत असल्याचे सांगितले जात आहे.

हॉलिवूड अभिनेत्याचा भ्रमणभाषसंच चोरीला गेल्यावर तक्रार नसतांनाही पोलिसांनी स्वतःहून तो शोधून दिला !

अभिनेते शाहरुख खान याच्या ‘जवान’ या चित्रपटाचे बिडकीन येथे चित्रीकरण होते. त्यासाठी हॉलीवूडचे अभिनेते आणि दिग्दर्शक जस्टिन लुंच शहरात आले होते. त्यांचा दीड लाख रुपयांचा आयफोन गहाळ झाला होता. याविषयी त्यांनी तक्रार प्रविष्ट केली नसतांनाही पोलिसांनी स्वतःहून तातडीने त्यांचा भ्रमणभाष शोधून त्यांना परत केला होता.

संपादकीय भूमिका

कोणत्याही नागरिकाची तक्रार घेणे, हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे. याची जाणीव असतांनाही तरुणीला एवढा वेळ ताटकळत ठेवणार्‍या उत्तरदायी पोलिसांची सरकारने तात्काळ हाकालपट्टी केली पाहिजे ! पोलिसांच्या अशा वृत्तीमुळेच जनतेचा त्यांच्यावरील उरलासुरला विश्‍वासही उडला आहे !