‘आदिपुरुष’सह सर्व हिंदी चित्रपटांवर काठमांडूमध्ये बंदी !

सीतामाता भारताची मुलगी असल्याच्या संवादावर आक्षेप !

काठमांडू (नेपाळ) – काठमांडू शहराचे महापौर बलेन शाह यांनी सर्व चित्रपटगृहांमध्ये कोणताही हिंदी चित्रपट प्रदर्शित न करण्याचा आदेश दिला. याविषयी अधिकृत घोषणा करतांना त्यांनी यासंबंधीची पत्रेही सर्व चित्रपटगृहांना पाठवली आहेत. नेपाळमध्ये ‘आदिपुरुष’ चित्रपटाला होणार्‍या विरोधानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आदिपुरुष चित्रपटामध्ये सीतामातेला ‘भारताची मुलगी’ असे संबोधण्यात आले आहे. त्यास नेपाळी लोकांनी आक्षेप घेतला आहे. ‘सीतामातेचा जन्म नेपाळमध्ये झाला आहे. मिथिला राज्य नेपाळमध्ये आहे. तेथे सीतामातेचा जन्म झाला असतांना ती भारताची मुलगी कशी असू शकते ?’ असा प्रश्‍न नेपाळी नागरिकांनी उपस्थित केला आहे.

याविषयी चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांनी म्हटले आहे, ‘‘रामायणाच्या वेळी नेपाळ नावाचा कोणताही देश अस्तित्वात नसल्याने मिथिला या भारताचाच भाग होता. त्यामुळे सीतामाता भारताचीच मुलगी आहे.’’ या विरोधामुळे चित्रपटातून हे वाक्या काढून टाकण्यात आले. त्यानंतर नेपाळमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याची अनुमती देण्यात आली असली, तरी कोणत्याही चित्रपटगृहाने तो प्रदर्शित केलेला नाही.