कॅनडा सरकारकडून भारतीय विद्यार्थ्यांच्या हद्दपारीला स्थगिती

भारतीय विद्यार्थ्यांची निदर्शने

ओटावा (कॅनडा) – भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर कॅनडा  सरकारने भारतीय विद्यार्थ्यांच्या हद्दपारीला स्थगिती दिली. यापूर्वीही कॅनडा सरकारने भारतीय विद्यार्थी लवप्रीत सिंह याला १३ जूनपर्यंत देश सोडण्याचा आदेश दिला होता. या आदेशानंतर भारतीय विद्यार्थ्यांनी तेथे निदर्शने चालू केली होती.

कॅनडातून भारतीय विद्यार्थ्यांना हद्दपार करण्याच्या निर्णयावर तेथील संसदेत मतदान झाले. या मतदानात भारतीय विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लागला. कॅनडाच्या खासदार जेनी कोवान यांनी म्हटले आहे की, भारतीय विद्यार्थी फसवणुकीचे बळी ठरले आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षा होऊ नये. हे विद्यार्थी संकटात सापडले आहेत. अशा स्थितीत त्यांना देश सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनीही भारतीय विद्यार्थ्यांना सर्वतोपरी साहाय्य करण्याचे संकेत दिले होते.