लव्ह जिहादच्या १२ प्रकरणांविषयी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना भेटणार ! – माजी खासदार किरीट सोमय्या

नगर – महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, नाशिक,‎ मुंबई, ठाणे, नगर या जिल्ह्यांतील‎ वेगवेगळी १२ लव्ह जिहादची‎ प्रकरणे माझ्याकडे आली आहेत.‎ नगर येथील एकूण ७ प्रकरणे माझ्याकडे‎ आली आहेत. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,‎ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची‎ आपण भेट घेणार आहोत. अशा‎ तक्रारी आल्यानंतर पोलिसांनीही‎ अधिक संवेदनशीलता दाखवावी.‎ वेळ पडल्यास केंद्रीय गृह‎ मंत्रालयाशीही मी चर्चा‎ करणार, अशी माहिती भाजपचे माजी‎ खासदार किरीट सोमय्या यांनी‎ दिली.‎ नगर येथील लव्ह जिहाद प्रकरणातील पीडित कुटुंबियांची ‎सोमय्या यांनी नुकतीच ‎जिल्हाधिकारी कार्यालयात भेट‎ घेऊन जिल्हाधिकार्‍यांसह पोलीस ‎अधिकार्‍यांशी संयुक्त चर्चा केली. ‎त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत‎ ते बोलत होते.

सोमय्या पुढे म्हणाले की,

१. सामाजिक‎ माध्यमांचा वापर करून लव्ह‎ जिहादचे प्रकार महाराष्ट्रात घडत‎ आहेत. गेल्या ३ वर्षांत महाराष्ट्रात‎ बेपत्ता असलेल्या महिलांची सूची काढण्याविषयीही आपण‎ गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट‎ घेणार आहोत.

२. नगर जिल्ह्यात झालेल्या जातीय‎ तणावाच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की,‎ पूर्वी सत्तेत असलेल्यांनी‎ असामाजिक तत्त्वांना बळ देण्याचे‎ काम केले होते. त्यात पोलिसांचेही‎ दुर्लक्ष झाले होते. तत्कालीन‎ सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव‎ ठाकरे यांनी भगवा सोडून हिरवा रंग‎ हाती घेतला. त्यामुळे ही संपूर्ण‎ प्रकरणे दाबली गेली.

३. लव्ह जिहाद प्रकरणात‎ वेळ पडल्यास केंद्रीय कायदामंत्री‎ यांच्याशीही चर्चा केली जाणार‎ आहे. याविषयी केंद्रीय गृह‎ मंत्रालयाच्या सर्व राज्यांची परिषद‎ घेऊन चौकशी करण्याची मागणी‎ आपण करणार असल्याचे सोमय्या‎ यांनी सांगितले.